कृषीमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून महायुतीचा नेता आक्रमक; थेट सरकारला सुनावलं
कर्जमाफीसंदर्भात प्रश्न विचारलेल्या शेतकऱ्यावर कृषीमंत्री चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं होतं. यावर आता सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, असं महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी सांगितलं होतं. त्यानंतर विधानसभेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवारांचा तब्बल 232 जगांवर विजय झाला. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात महायुतीची सत्ता आली. आता सरकार कधी कर्जमाफी देणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार की नाही मिळणार? यावरून आता संभ्रम निर्माण होताना दिसत आहे.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी एका शेतकऱ्यानं त्यांना कर्जमाफीबद्दल प्रश्न विचारला, प्रश्न ऐकताच ते चांगलेच संतापले, त्यांनी उलट शेतकऱ्यांनाच सुनावलं आहे. पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहता. तोपर्यंत कर्ज भरत नाही, कर्जाच्या पैशांमधून लग्न, साखरपुडा करता असं माणिकराव कोकाटे यांनी या शेतकऱ्यांना सुनावलं आहे. दरम्यान माणिकराव कोकाटे यांच्या या वक्तव्यावर आता आमदार सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले खोत?
राज्याचे कृषीमंत्री यांनी ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांबाबत विधान केलं ते योग्य आहे असं मला वाटत नाही. परंतु त्यांचा बोलण्याचा हेतू वेगळा असू शकतो, कृषीमंत्री झाल्यानंतर त्यांचं काम पाहिलं तर समाधानकारक आहे. या राज्यातील शेतकऱ्यांचं कर्जमाफ केलं पाहिजे. याचं कारण शेतकऱ्याचं कर्ज हे सरकारच्या धोरणामुळे झालेलं आहे, सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण ठरलेलं आहे, असं यावेळी बोलताना सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, खऱ्या अर्थाने शेतकरी विरोधी जे कायदे आहेत ते आपल्याला रद्द करावे लागतील, शेतमालाला चांगला भाव मिळेल या संदर्भामध्ये धोरण आखावे लागतील. आणि जोपर्यंत आपण शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवेल असं धोरण आखणार नाही. तोपर्यंत शेतकरी विरोधी कायदे हटणार नाहीत. तोपर्यंत शेतकरी हा कर्जबाजारीच राहणार आहे. शेतकऱ्यांच्या अपेक्षा आपण लक्षात घेतल्या पाहिजेत, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.