VIDEO : कृष्णामाई घरातच नांदून गेली, घराच्या भिंती, छप्पर, होतं नव्हतं ते सगळंच घेऊन गेली
पुरानंतरची गावातील परिस्थिती अतिशय बिकट आहे. लोकांचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला आहे. आयुष्यभर ज्या घराला सजवलं, जिथे संसार थाटला, त्याच घराची पुराने दैना केली. आता कुठून सुरुवात करायची? अनेकांना हा प्रश्न पडला आहे.
सागंली : कृष्णामाईच्या पुरात (Sangli Flood) उद्ध्वस्थ झालेल्या भागात आता हळू-हळू पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. आठवड्याभरापूर्वी जेव्हा पुराचं पाणी गावात शिरायला लागलं होतं, तेव्हा आहे त्याच स्थितीत अंगावरच्या दोन जोडी कपड्यावरच अख्खी गावच्या गावं रिकामी झाली. आता अनेक भागांमध्ये पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. पण, पुरानंतरची गावातील परिस्थिती अतिशय बिकट आहे. लोकांचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला आहे. आयुष्यभर ज्या घराला सजवलं, जिथे संसार थाटला, त्याच घराची पुराने दैना केली. आता कुठून सुरुवात करायची? अनेकांना हा प्रश्न पडला आहे. आमणापूर गावातल्या एका जोडप्याचीही अशीच स्थिती आहे. घरात कमरेपर्यंत झालेला चिखल अजूनही प्रशासनाला, या सरकारला दिसत कसा नाही, असा सवाल या जोडप्याने उपस्थित केला आहे.
गावात पुराचं पाणी भरायला लागलं, त्यामुळे लवकरात लवकर गाव सोडावं लागलं. तेव्हा आहे त्या स्थितीत गाव सोडत लोकांनी आपला संसार देवाच्या भरवश्यावर सोडला. यावेळी पुराचं पाणी त्यांच्या घरापर्यंत येईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. मात्र, यावेळी कृष्णामाई घरातच नांदून गेली आणि जाताना घराच्या भिंती, छप्पर होतं, नव्हतं ते सगळंच घेऊन गेली. आता जे काही उरलं आहे, त्यात आमणापूर गावातील मुळीक कुटूंब सावरायचा प्रयत्न करत आहेत. पण, पुरामुळे येत्या काळात शेतात रोजगारही मिळणार नाही, मग आम्ही खायचं काय? आणि घर बांधायचं कसं? याचा विचारही हेलावून टाकतो, अशी प्रतिक्रिया या कुटुंबाने दिली.
पूरग्रस्त भागातल्या गावात अचानक घुसलेल्या पुराच्या पाण्याने लोकांचे संसार तर वाहून नेलेच, पण त्याहीपेक्षा वाईट म्हणजे, आता या लोकांकडे घरात खाण्यासाठी धान्याचा एक कणही उरलेला नाही. घरात वर्षभरासाठी लागणाऱ्या गहू, ज्वारी, तांदुळ, दाळी-धुळींची साठवण केलेली असते. आठ दिवस पाण्याखाली असलेल्या घरातल्या या धान्याला आता जनावरही तोंड लावणार नाही, अशी परिस्थिती आहे. पुरात सापडलेल्या गावात रोजच्या खाण्यासाठी साठवणूक केलेलं हजारो क्विंटल धान्य वायाला गेलं आहे. हे सगळ सांगताना या गावातील माऊलींच्या डोळ्यातलं पाणी बरच काही सांगुन जात होतं.
हेगी वाचा : दुष्काळात रेल्वेने पाणी; आता लातूरकडून सांगलीच्या उपकाराची परतफेड!
पुराच्या पाण्यानं फक्त माणसंच नाही, तर जनावरांचे देखील अतोनात हाल केलेत. यामध्ये दुभती आणि पाळीव जनावरंच नाही, तर या परिसरातील मोर, वानरं यांच्याबरोबरच साप यांच्याही जिवावर हा पूर आला आहे. पाण्यामुळे राहती जागा गेल्याने विषारी नागांनी आता गावातल्या घरांचाच आसरा घेतला आहे. गेल्या चार-पाच दिवसांत स्थानिक भागातील सर्पमित्रांनी शेकडो विषारी सापांना सुरक्षित बाहेर काढलं खर, पण पडझड झालेल्या घरांमध्ये आढळणाऱ्या या विषारी सापांमुळे लोकांच्या आणि सापाच्याही जिवाला धोका निर्माण झाला आहे.
घरात मीठ-मिरचीही उरलेली नाही, होतं नव्हतं तेवढं सगळ वाहून गेलं, सरकारी मदत मिळायची तेव्हा मिळेल. पणं आत्ता सध्या पोटाला खायचं तरी काय, हा प्रश्न इथल्या प्रत्येक पूरग्रस्त गावकऱ्याला पडला आहे. वाहून गेलेला संसार गोळा केल्यानंतरची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, त्याचं वर्णन करताना गावकऱ्यांचे अश्रू अनावर झाले. आता नवा संसार उभारायचा तरी कसा आणि कुणाच्या भरवश्यावर असा प्रश्न या गावकऱ्यांना पडला आहे.
पाहा व्हिडीओ :