तुकोबांच्या पालखीचा रथ ओढण्याचा मान, सोन्या आणि राजाची निवड कशी झाली?
संत तुकाराम महाराजांचा पालखी रथ ओढण्याचा मान बाणेर येथील शेतकरी बाबुराव चिंधु विधाते यांच्या सोन्या आणि राजा या जोडीला मिळाला आहे.
पुणे : संत तुकाराम महाराजांचा पालखी रथ ओढण्याचा मान बाणेर येथील शेतकरी बाबुराव चिंधु विधाते यांच्या सोन्या आणि राजा या जोडीला मिळाला आहे. संत तुकाराम महाराजांच्या 334 व्या पालखी सोहळ्याची तयारी श्रीक्षेत्र देहूमध्ये मोठ्या उत्साहात सुरु आहे. येत्या 24 जूनला पालखीचं प्रस्थान होणार आहे. या पालखीचा रथ ओढण्याचा मान सोन्या आणि राजाला मिळाला आहे. सोन्या आणि राजा तुकाराम महाराजांचा पालखी रथ देहू ते पंढरपूर असा ओढणार आहेत.
यंदा पालखी रथ ओढण्यासाठी संस्थानकडे 14 अर्ज आले होते. त्यापैकी 7 बैल मालकांची जनावरे ही सुदृढ शरीरयष्टीची होती. त्यामुळे तुकाराम महाराज संस्थानांच्या निवड समितीकडून, बैलांची निवड करणे अवघड झाले होते. यासाठीच सातही बैल मालकांच्या नावाची चिठ्ठी उडवून रथासाठी बैलांची निवड करण्यात आली. यावेळी पहिला मान बाणेर येथील शेतकरी बाबुराव चिंधु विधाते यांच्या सोन्या आणि राजा या जोडीला मिळाला. तर दुसऱ्या बैलजोडीचा मान रविंद्र बाळासाहेब कोंढरे (अंबेगाव नऱ्हे) यांच्या बैलजोडीला मिळाला.