पुण्यात पोलीस अधिकाऱ्याच्याच मुलाला कोयत्याने तोडले; पाच जण फरार; तरुणीने हत्या केल्याचा संशय
उद्रेश्वर गायकवाड यांचा अवघ्या 21 वर्षांचा गिरीधर हा मुलगा होता. त्याच्या हत्येमुळे गायकवाड कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गिरीधरची हत्या करणाऱ्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी गिरीधरच्या कुटुंबीयांनी केली आहे.
पुणे: पुण्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या (Senior Police Officer) 21 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या (Police Son Murder) करण्यात आल्याने पुण्यात (Pune) एकच खळबळ उडाली आहे. या हत्येमागील अजून नेमकं कारण समोर आलं नाही. पुणे शहरातील पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची जर हत्या होत असेल तर सर्वसामान्यांच्या मुलांचे काय असा प्रश्न आता नागरिकांतून उपस्थित होत आहे. या हत्येबाबत नेमकं कारण अद्याप समोर आलं नसलं तरी पोलिसांनी कसून तपास चालू केला असून लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील असेही पोलिसांनी सांगितले आहे.
याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका तरुणीने चौघांच्या मदतीने पोलिसाच्या मुलाची हत्या केल्याचे पोलीसांनी सांगितले आहे. या हत्येमागे नेमकं कारण काय आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. अमरावती मध्यवर्ती कारागृहात तुरुंग अधिकारी म्हणून कार्यरत असलेलेले उद्रेश्वर गायकवाड यांच्या मुलाची पुण्यात काल रात्री निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर पुण्यात मोठी खळबळ माजली आहे.
कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
उद्रेश्वर गायकवाड यांचा अवघ्या 21 वर्षांचा गिरीधर हा मुलगा होता. त्याच्या हत्येमुळे गायकवाड कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गिरीधरची हत्या करणाऱ्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी गिरीधरच्या कुटुंबीयांनी केली आहे. प्राथमिक तपासात असे स्पष्ट झाले आहे की, एका तरुणीने ही हत्या घडवून आणल्याचे सांगितले जात आहे. गिरीधरचे आणि त्या तरुणीचे काय संबंध होते, प्रेमाचे संबंध होते तर त्यांचे वाद झाले होते का आणि झाले असतील तर ते वाद कशावरुन झाले होते याचा तपास आता पोलीस करत आहेत.
तरुणीचा फोन आला अन् तो गेला
मृत गिरीधर हा मंगळवारी रात्री आपल्या पुण्यातील घरी होता. त्याला रात्री नऊ वाजता एका तरुणीचा फोन आला. त्या फोननंतर तो घराबाहेर पडला.त्यानंतर त्या तरुणीने इतर पाच सहकाऱ्यांसोबत त्याची निर्घृण हत्या केली. आपला मुलगा घराबाहेर पडून बराच वेळ झाला तरी घरी आला नाही म्हणून गायकवाड कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरु केला. त्यानंतर काही वेळानंतर गिरीधरचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली.
अनोळखी पाच जणांविरोधात गुन्हा
या प्रकरणी अनोळखी पाच जणांविरोधात हडपसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून गिरीधरचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याद्वारे आता या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे. शेवटचा फोन त्याला साक्षी पांचाळ हिचा आला होता, त्यानंतर तिला भेटून येतो असं सांगून तो घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. ही घटना घडल्यानंतर काही मिनिटांनी अमरावतीला जेलर असलेल्या वडिलांच्या त्याच्या घरी फोन आला. ग्लायडिंग सेंटर येथील मैदानात गिरीधरचा खून झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर तो मृतदेह गिरीधरचाच असल्याचे सांगण्यात आले.
एक तरुणी आणि चार पुरुषांनी केला हल्ला
प्रत्यक्षदर्शीनी सांगितले की, चार पुरुष आणि एक तरुणी यांनी गिरीधरवर कोयत्याने सपासप वार केले. त्यानंतर हल्लेखोर सासवडच्या दिशेने पळून गेले. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.