थायलंडच्या राजाचे महिला बॉडीगार्डशी लग्न
बँकॉक : थायलंडचे राजा महा वजीरालोंगकोर्न यांनी त्यांच्या अधिकृत राज्याभिषेकाच्या एकच दिवस आधी आपल्या महिला बॉडीगार्ड सुथिदा तिजाई यांच्याशी लग्न केले. सुथिदा वजीरालोंगकोर्न यांच्या खासगी सुरक्षा दलात उपप्रमुख आहेत. या लग्नाची घोषणा ‘रॉयल गॅझेट’ या वृत्तपत्रातून करण्यात आली. तसेच रॉयल न्युजसह सर्वच चॅनेलवर या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात आले. वजीरालोंगकोर्न हे 66 वर्षांचे आहेत. त्यांना राजा […]
बँकॉक : थायलंडचे राजा महा वजीरालोंगकोर्न यांनी त्यांच्या अधिकृत राज्याभिषेकाच्या एकच दिवस आधी आपल्या महिला बॉडीगार्ड सुथिदा तिजाई यांच्याशी लग्न केले. सुथिदा वजीरालोंगकोर्न यांच्या खासगी सुरक्षा दलात उपप्रमुख आहेत.
या लग्नाची घोषणा ‘रॉयल गॅझेट’ या वृत्तपत्रातून करण्यात आली. तसेच रॉयल न्युजसह सर्वच चॅनेलवर या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात आले. वजीरालोंगकोर्न हे 66 वर्षांचे आहेत. त्यांना राजा राम दहावे म्हणूनही ओळखले जाते. त्यांच्याआधी थायलंडचे राजा भुमीबोल अदुल्यादेज हे होते. त्यांनी 70 वर्षे थायलंडची गादी सांभाळली. त्यांचे ऑक्टोबर 2016 मध्ये निधन झाल्यानंतर वजीरालोंगकोर्न हे थायलंडचे राजा झाले. राजा भुमीबोल यांच्या निधनानंतर एक वर्ष दुखवटा घोषित करण्यात आला होता. त्यामुळे वजीरालोंगकोर्न यांचा अधिकृत राज्याभिषेक होऊ शकला नव्हता. तो राज्यभिषेक आता होत आहे.
कोण आहेत सुथिदा तिजाई?
सुथिदा तिजाई या थायलंड एअरवेजमध्ये फ्लाईट अटेंडन्ट होत्या. वजीरालोंगकोर्न यांनी त्यांची 2014 मध्ये आपल्या सुरक्षा दलात डेप्युटी कमांडर म्हणून नेमणूक केली. त्यावेळी परदेशी माध्यमांनी वजीरालोंगकोर्न आणि सुथिदा यांच्या नात्याबाबत अंदाजही लावले. मात्र, त्यावेळी राजमहालाकडून याला दुजोरा देण्यात आला नाही. राजा वजीरालोंगकोर्न यांनी सुथिदा यांना डिसेंबर 2016 मध्ये रॉयल थाय आर्मीमध्ये जनरल बनवले. त्यानंतर 2017 मध्ये सुथिदा यांना राजाच्या खासगी सुरक्षा दलात डेप्युटी कमांडर म्हणून नियुक्त केले. वजीरालोंगकोर्न यांनी सुथिदांना ‘थनपुयींग’ ही रॉयल उपाधीही दिली. ‘थनपुयींग’ म्हणजे राणी. या लग्नाला राजघराण्यातील अनेक मान्यवर हजर होते.
वजीरालोंगकोर्न यांची याआधी 3 लग्ने आणि घटस्फोट झाले आहेत. त्यांना 5 मुलं आणि 2 मुली असे 7 अपत्य आहेत.