डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची हकालपट्टी
विविध धोरणात्मक निर्णयांवर मतभेद असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. तर आपण स्वतःहूनच राजीनामा दिल्याचं जॉन बोल्टन (US NSA John Bolton) यांनी ट्विटरद्वारे सांगितलंय. त्यामुळे दोघांपैकी नेमकं कोण खरं हा प्रश्न पडला आहे.
वॉशिंग्टन, अमेरिका : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या अधिकाऱ्यांमधील मतभेद हे नवीन नाहीत. पण त्यांनी चक्क अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन (US NSA John Bolton) यांचीच पदावरुन हकालपट्टी केली आहे. विविध धोरणात्मक निर्णयांवर मतभेद असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. तर आपण स्वतःहूनच राजीनामा दिल्याचं जॉन बोल्टन (US NSA John Bolton) यांनी ट्विटरद्वारे सांगितलंय. त्यामुळे दोघांपैकी नेमकं कोण खरं हा प्रश्न पडला आहे.
तुमच्या सेवेची व्हाईट हाऊसला यापुढे गरज नाही, असं सोमवारी रात्री जॉन बोल्टन यांना कळवलं आणि बोल्टन यांनी मंगळवारी सकाळी राजीनामा दिला, अशी माहिती ट्रम्प यांनी दिली. बोल्टन यांचा अनेक निर्णयांना प्रखर विरोध होता, असंही ट्रम्प यांनी म्हटलंय.
ट्रम्प आणि बोल्टन यांनी दोघांनीही ट्विटरवर आपापली बाजू मांडली. आपण स्वतःहून राजीनामा दिला, पण यावर सकाळी बोलू, असं उत्तर ट्रम्प यांनी दिलं असल्याचं ट्वीट बोल्टन यांनी केलं.
ट्रम्प यांचा निर्णय अनेकांसाठी आश्चर्यकारक होता. कारण, एक तासापूर्वीच ट्रम्प यांनी जाहीर केलं होतं, की राज्य सचिव माईक पॉम्पियो यांच्यासोबत बोल्टनही मीडियाला संबोधित करतील.
जॉन बोल्टन यांनी नेहमीच ट्रम्प यांच्या उत्तर कोरिया धोरणाबाबत सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं होतं. शिवाय सीरियामधून अमेरिकन सैन्य परत बोलावण्याच्या निर्णयाचाही बोल्टन यांनी विरोध केला होता. सीरियामध्ये दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी अमेरिकन सैन्य तिथेच राहणं गरजेचं असल्याचं सांगण्याचा प्रयत्न बोल्टन यांनी केला होता.
बोल्टन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे तिसरे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून एप्रिल 2018 मध्ये पदभार सांभाळला होता. लष्कर प्रमुख एच. आर. मॅकमास्टर यांच्यानंतर बोल्टन यांना संधी देण्यात आली होती.