ताई गेली, मात्र भय कायम! हिंगणघाटच्या विद्यार्थिनी भीतीच्या छायेत
हिंगणघाट जळीतकांडांतील 24 वर्षीय प्राध्यापिकेच्या मृत्यूनंतर एकीकडे दारोडा गावावर शोककळा पसरली आहे. तर दुसरीकडे, दारोडा गावातील विद्यार्थिनींमध्ये भीतीचं वातावरण आहे.
वर्धा : हिंगणघाट जळीतकांडांतील 24 वर्षीय प्राध्यापिकेच्या मृत्यूनंतर एकीकडे दारोडा गावावर शोककळा पसरली आहे. तर दुसरीकडे, दारोडा गावातील विद्यार्थिनींमध्ये भीतीचं वातावरण आहे (Hinganghat Teacher Burn Case). या घटनेनंतर विद्यार्थिनींचं शाळेतील प्रमाण घटलं आहे. पीडितेसोबत जे घडलं ते आमच्यासोबतही घडू शकतं, अशी भीती त्यांच्या मनात आहे.
हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील पीडितेवर काल तिच्या गावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. तिच्या निधनानंतर दुसऱ्या दिवशी, भीतीमुळे बऱ्याच विद्यार्थिनी शाळेत आल्याच नाहीत. एका प्राध्यापिकेला जिवंत जाळलं जातं, तर आमचं काय होणार?, अशी काळजी या विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांना भेडसावत आहे.
भीतीमुळे गावातील मुलींचे आई-वडील त्यांना घराबाहेर पाठवायला देखील घाबरत आहेत. भीतीपोटी आमचं शिक्षण बंद होणार का?, असा प्रश्न या विद्यार्थिनी उपस्थित करत आहेत. घराबाहेर पडलं की मुलांच्या ‘त्या’ नजरांचा सामना करावा लागतो, आमच्या सुरक्षेची हमी द्या, अशी मागणी दारोड्यातील विद्यार्थिनींनी सरकारकडे केली आहे.
हिंगणघाट जळीतकांडानंतर वर्धा जिल्ह्यातील दारोडा गाव देशभरात चर्चेला आलं. आठ दिवसांपूर्वी दारोडा गावातील एका 24 वर्षीय प्राध्यापिकेवर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये ती 40 टक्के भाजली होती. तब्बल आठ दिवस तिने मृत्यूशी झुंज दिली. मात्र, अखेर 10 फेब्रुवारीला तिचा मृत्यू झाला.