कलाविश्वातील मंडळी हे त्यांच्या फिटनेससाठी (Fitness) नेहमीच जागरूक असतात. आपण काय खावं, किती प्रमाणात खावं आणि किती व्यायाम करावा यांविषयी ते तज्ज्ञांकडून सल्ले घेऊन लाईफस्टाईलमध्ये आवश्यक ते बदल करतात. शारीरिक आणि मानसिक आरोग्याला प्राधान्य देणं म्हणजे निरोगी जीवनशैली असल्याचं अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सांगते. आपल्या जीवनशैलीत अधिकाधिक सुसंगती आणण्यावर तिचा भर असतो. अनेकदा आपल्याला असं वाटतं की आज व्यायाम करू नये किंवा खूप गोड खावं. परंतु आपल्या रोजच्या जीवनशैलीच्या उद्दिष्टांमध्ये अडथळा न आणता या गोष्टीसुद्धा आपण करू शकतो, असं ती म्हणते. उदाहरणार्थ, जिममध्ये व्यायाम करायचा कंटाळा आल्यास त्या दिवशी पोहायला जा. गोड खावंसं वाटत असेल तर साखरेच्या पदार्थांऐवजी गुळावर अधिक भर द्या. अखेर निरोगी जीवनशैलीचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे अशा गोष्टी करणं ज्यामुळे तुम्हाला आनंद होतो. आरोग्य आणि आनंद या एकाच नाण्याच्या दोन पैलू आहेत यावर अनुष्काचा ठाम विश्वास आहे. (Cheat Day)
अनेकदा आपण ‘चीट डे’ हा शब्द ऐकतो. चीट डे या संकल्पनेचा आधार घेऊन आपण त्यादिवशी आपल्याला वाटेल ते आणि आवडेल ते पदार्थ खातो. पण त्यातही अतिरेक केल्याचा फटका नंतर बसतो. याविषयी अनुष्काने अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला आहे. “माझ्यासाठी हेल्थी लाईफस्टाईल आणि हेल्थी खाणं हा माझ्या जीवनाचा एक मार्ग बनला आहे. त्यामुळे जरी मला ‘चीट डे’ला स्वतःचे लाड करायचे असेल तरी मी नेहमी त्यातही योग्य पदार्थ निवडेन याची काळजी घेते. माझ्या आहारात मी जाणीवपूर्वक नाचणी आणि ज्वारी, बाजरीचा समावेश करते. ते बनवायला सोपे असतात आणि चवीलाही स्वादिष्ट असतात. यासाठी तुमच्या सध्याच्या पाककृतींमध्ये संपूर्ण फेरबदल करायची गरज नाही,” असं ती सांगते.
“ताटात असलेल्या अन्नाचा पुरेपूर आनंद घेत मी आस्वाद घेते. माझ्यासाठी चांगला आहार म्हणजे एखादी फॅन्सी डिश किंवा बाहेरचं खाणं नाही. रोजच्या जीवनातील घरचेच पदार्थ वापरून बनवलेले पदार्थच मला नेहमी आवडतात. जे पदार्थ खात मी लहानाची मोठी झाले, तेच माझे आताही आवडते पदार्थ आहेत. खिचडी आणि पल्लेयो हे माझे आवडते पदार्थ आहेत”, असं ती म्हणाली.