काय? उशीमुळे तुमच्या सौंदर्याला लागू शकतो डाग? कसे ते जाणून घ्या…
बऱ्याच लोकांना चेहऱ्यावर पिंपल्स, मुरुमं येण्याचा त्रास असतो. धूळ आणि प्रदूषण यासाठी कारणीभूत ठरते. पण तुमच्या उशीचे कव्हर किंवा अभ्रा हेही त्वचेच्या समस्येचे कारण ठरू शकते, याची तुम्हाला कल्पना आहे का ?
नवी दिल्ली – केवळ तुमच्या उशीचे कव्हर किंवा अभ्रा बदलून तुम्ही त्वचेसंदर्भात अनेक आश्चर्यकारक बदल पाहू शकता. खरंतर एका रिपोर्टनुसार, आठवड्यातून एकदा तरी उशीचा अभ्रा (pillow cover) जरूर बदलावा. हे तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरेल. केवळ तुमच्य उशीचा अभ्रा बदलून तुम्ही मुरुमे (pimples), डेड स्कीन (dead skin) आणि बॅक्टेरिया (bacteria) पासून कसे वाचू शकता ? उशीचा अभ्रा बदलला नाही तर त्वचेशी संबंधित समस्यांचा सामना का करावा लागतो ? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.
खरंतर, आपण ज्या उशीवर डोकं ठेवून झोपतो, ती उशी (आपण विचार करतो त्यापेक्षा) जास्त घाणेरडी असू शकते. धुळीचे कण, बॅक्टेरिया, डोक्याला लावलेले तेल, केस असे अनेक घटक अभ्र्याला चिकटलेले असतात. अशा परिस्थितीत जेव्हा आपण उशीवर डोके ठेवून झोपतो तेव्हा आपला चेहराही या गोष्टींच्या संपर्कात येतो. ही घाण आपल्या त्वचेच्या छिद्रांमध्ये जाते, त्यामुळे ही छिद्रे बंद होतात. छिद्र बंद झाल्यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यामध्ये मुरुम आणि पिंपल्स यांचा समावेश असतो.
झोपताना आपण चुकून उशीच्या कव्हरवर चेहरा घासतो, त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. गलिच्छ उशी कव्हरमुळे आपल्याला केसांशी संबंधित समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. केस उशीवर घासल्यावर केसांचा ओलावा निघून जातो व केस कोरडे होतात. यामुळे केस तुटणे आणि गळणे अशा केसांच्या संदर्भातील समस्या सुरू होतात. जर तुम्ही केसांशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल, तर उशीचे कव्हरदेखील त्याचे कारण असू शकते.
बरेचसे असे लोक असतात, जे वर्षानुवर्षं एकच उशी वापरतात. त्यामुळे वर्षातून एकदा तरी उशी बदलावी. मऊ उशीचा वापर करावा. तसेच झोपताना केस बांधून झोपावे. केस मोकळे ठेऊन झोपल्यास केसांचे मोठे नुकसान होऊ शकते. तसेच आठवड्यातून एकदा तरी उशीचा अभ्रा बदलून तो स्वच्छ धुवून घ्यावा, जेणेकरून त्यामध्ये घाण साचून राहणार नाही. तसेच बेडशीट, मेकअप ब्रश, ब्युटी ब्लेंडर आणि तुमचा टॉवेल या गोष्टी नियमितपणे स्वच्छ केल्या पाहिजेत. स्वच्छतेची नीट काळजी घेतल्यास तुमच्या त्वचेसंदर्भातील समस्या कमी होऊ शकतात तसेच मुरुमे, पिंपल्स यांचा त्रास होणार नाही.