Special Story | शादी से पहले… मेरी मर्जी!
विवाहपूर्व संबंधातून गर्भवती राहिलेल्या सेलिब्रिटी आणि त्यांचं पूर्वायुष्य याच्यावर प्रकाशझोत टाकणारा एक्स-रे
मुंबई : विवाहबाह्य संबंध असो किंवा विवाहपूर्व… समाजाच्या दृष्टीने ते कायमच चर्चेचा विषय ठरतात. त्यामुळेच एखाद्या सेलिब्रिटीने आपल्या खाजगी आयुष्यातील अशी हळवी बाजू स्वतःहून उघड केली, तरी ते सार्वजनिक चर्वणासाठी निमित्त होते. प्रसारमाध्यमांपासून समाजमाध्यमांत त्याच्या चर्चा रंगतात, आंबटशौकिन गुगलवर फोटो सर्च करुन भानगडी उकरुन काढतात, नसत्या गोष्टींचे संदर्भ जोडले जातात. एका राजकीय नेत्यावर आपण परस्पर सहमतीने ठेवलेल्या संबंधांची जाहीर वाच्यता करण्याची वेळ आली आणि राजकीय धुरळा उडाला. पण या निमित्ताने विषय निघाला सेलिब्रिटींनी उघडपणे स्वीकारलेल्या आपल्या विवाहबाह्य आणि विवाहपूर्व संबंधांची. प्रख्यात टेनिसपटू स्टेफी ग्राफ (Stefffi Graf) असो, किंवा न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन (Jacinda Ardern), अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta), कोंकणा सेन शर्मा (Konkona Sen Sharma) यांची विवाहपूर्व प्रेग्नन्सी गाजली. (International Celebrities who deliver babies before marriage)
आधी पंतप्रधानपदावर असताना बाळंतपण, मग लग्न
न्यूझीलंडच्या पंतप्रधानपदी असताना जेसिंडा अर्डर्न यांनी बाळाला जन्म दिला. विशेष म्हणजे तेव्हा त्यांचं लग्न झालं नव्हतं. पंतप्रधान पदावर असताना मुलाला जन्म देणाऱ्या अर्डर्न या जगातील दुसऱ्या पंतप्रधान ठरल्या होत्या. अनेक वर्षांपासून त्या बॉयफ्रेंड क्लार्क गेफोर्ड यांच्यासोबत रिलेशनशीपमध्ये होत्या. मुलीच्या जन्मानंतर जवळपास वर्षभराने दोघांनी विवाह केला.
एखाद्या देशाच्या पंतप्रधानाने लग्नाआधी बाळाला जन्म देण्याचं उदाहरण विरळाच. विशेष म्हणजे याचा अजिबात बाऊ करण्यात आला नाही. मुलीच्या जन्मानंतर अर्डर्न यांचे बॉयफ्रेंड गेफोर्ड यांनी घरी राहून मुलीचा सांभाळ केला, तर अर्डर्न यांनी देशाची जबाबदारी सांभाळली. जागतिक व्यासपीठावरही अर्डर्न या मुलीला घेऊन गेल्या होत्या. वडिलांनी घरी राहून बाळाचं पालनपोषण करणं, हाही भारतीय पितृसत्ताक संस्कृतीला धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल.
नीना गुप्ताचा बोल्ड निर्णय
मला बाळाला जन्म द्यायचा आहे. मात्र त्याच्या वडिलांशी लग्न करण्यात मला काडीमात्र रस नाही, असं वाक्य एखाद्या तरुणीने एकविसाव्या शतकात उच्चारलं, तरी कुठल्याही कुटुंबात भूकंप येईल. मात्र अभिनेत्री नीना गुप्ता यांनी 1988 मध्ये हा निर्णय आपल्या आई-वडिलांना पचनी पाडायला लावला.
अभिनेत्री नीना गुप्ता आणि वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू विविअन रिचर्ड्स यांचं अफेअर सुरुवातीला जगजाहीर नव्हतं. अफेअरच्या वेळी विविअन पहिल्या पत्नीपासून विभक्त झाले होते. 1989 मध्ये नीना गुप्ता प्रेग्नंट होत्या. कन्या मसाबाच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांनी एकटीने उचलली.
नीना गुप्तांनी बाळाच्या वडिलांचं नाव कधीच जाहीर केलं नव्हतं. मात्र एका वृत्तपत्रात मसाबाचं बर्थ सर्टिफिकेट छापून आलं आणि खळबळ उडाली. नीना गुप्ता यांनी विविअनसोबत आपण कधीच भावनिकरित्या गुंतलो नसल्याचं सांगितलं होतं.
विविअन रिचर्ड्स यांनी मसाबा ही आपली कन्या असल्याचं कबूल केलं. ते नीना-मसाबा यांना भेटायला नेहमी मुंबईला येत असत. मात्र नीना गुप्ता यांनी सिंगल मदर हीच स्वतःची ओळख कायम ठेवली. (International Celebrities who deliver babies before marriage)
स्टेफी आणि आगासीचं टेनिस ‘लव्ह’
टेनिस स्टार स्टेफी ग्राफ आणि आंद्रे आगासी यांची प्रेमकहाणीही काळाच्या पुढचीच. 1999 मध्ये स्टेफी आणि आंद्रे यांनी डेटिंग करायला सुरुवात केली. त्यावेळी आंद्रे घटस्फोटित होता. त्यानंतर लास वेगासमधील आंद्रेच्या घरात स्टेफीसोबत त्याचं सहजीवन फुलायला लागलं.
दोन वर्षांतच त्यांना बाळाची चाहूल लागली. स्टेफी आणि आंद्रे यांनी लपूनछपून लग्न केल्याच्या चर्चा त्या काळी मीडियामध्ये रंगल्या होत्या. स्टेफीच्या बोटातील सोन्याची अंगठी या चर्चांना खतपाणी घालत होतं. ग्रँड स्लॅम गाजवणाऱ्या स्टेफी आणि आंद्रे यांच्या प्रेमाचे किस्से आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजले होते.
कोंकणा-रणवीरची प्रीवेडिंग प्रेग्नन्सी
अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा आणि अभिनेता रणवीर शौरी यांच्यातही लग्नाआधीपासून संबंध असल्याच्या चर्चा होत्या. मिक्स्ड डबल्स चित्रपटाच्या सेटवर दोघांची ओळख झाली. त्यांनी डेटिंग सुरु करताच पापाराझींच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. त्यानंतर कोंकणा गरोदर असल्याने दोघांनी घाईघाईत लगीनगाठ बांधली, असंही म्हटलं जाई. 2010 मध्ये कोंकणा-रणवीर यांनी लग्न केलं. त्यानंतर महिनाभरातच कोंकणाच्या प्रेग्नन्सीची घोषणा झाली.
जेमतेम तीन वर्षात कोंकणा आणि रणवीरमध्ये सारं काही आलबेल नसल्याच्या वार्ता समोर आल्या. 2015 मध्ये रणवीर कोंकणा यांनी संयुक्त स्टेटमेंट काढत आपण घटस्फोट घेत असल्याची अधिकृत घोषणा केली.
(International Celebrities who deliver babies before marriage)