Hair Care : केसांना कधी लावू नये तेल? कशी घ्यावी केसांची काळजी? जाणून घ्या…
केसांना पोषण मिळावे, त्यांची चांगली वाढ व्हावी म्हणून नियमितपणे तेल लावण्याचा सल्ला दिला जातो. मात्र काही वेळा केसांना तेल न लावणेच उत्तम असते, अन्यथा केस गळण्याची समस्या वाढू शकते.
Hair Care Tips : लहानपणापासूनच आपल्या सर्वांना केसांना तेल लावण्याचे महत्त्व सांगितले जाते. केसांना पोषण मिळावे, त्यांची चांगली वाढ व्हावी म्हणून नियमितपणे तेल लावण्याचा (Hair care) सल्ला दिला जातो. मात्र हेच तेल केसांसाठी नेहमीच फायदेशीर ठरेल, असे नाही. काही वेळा चुकीच्या वेळेस तेल लावल्यानेही केसांच्या समस्या वाढू शकतात. केसांची काळजी घेतानाच, त्यांच्यासाठी काय योग्य, काय अयोग्य याकडेही नीट लक्ष दिले पाहिजे. काही वेळा केसांना तेल न लावणेच उत्तम असते, अन्यथा केस गळण्याची (Hair fall) समस्या वाढू शकते. खूप तेल लावल्यानेही केसांचे तसेच त्वचेचे नुकसान (Hair Problem) होऊ शकते. त्यामुळे केसांना तेल लावणे कधी टाळावे, याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
केसांना तेल कधी लावू नये?
ॲक्ने (मुरुमे) –
जेव्हा तुमच्या कपाळावर अथवा डोक्याच्या आजाबाजूला लालसर फोड किंवा ॲक्ने म्हणजेच मुरुमे दिसू लागतात, तेव्हा केसांना तेल लावणं टाळलं पाहिजे. अन्यथा ते तेल या मुरुमांमध्ये किंवा ॲक्नेमध्ये साचून परिस्थिती आणखी बिघडू शकते. ॲक्नेची समस्या दूर करण्यासाठी केस स्वच्छ ठेवा आणि ते कपाळावर जास्त येऊ देऊ नका.
कोंडा –
केसांत खूप कोंडा झाला असेल तर तेल लावणे टाळावे. कोंड्याची समस्या दूर करायची असेल तर केसांपासून काही काळ तेलही दूर ठेवावे. तेल लावल्याने केसांतील कोंडा आणखी वाढण्याची शक्यता असते.
ऑईली स्काल्प –
तुमची त्वचा ऑईली असेल आणि केसही लगेच तेलकट होत असतील, तर त्यावर आणखी तेल लावणे टाळावे.
फोड –
तुमच्या डोक्यावर किंवा स्काल्पमध्ये फोड येत असतील तर तेलाचा वापर टाळावा. तेलामुळे त्वचेवरील बॅक्टेरिअल फोड आणखी वाढू शकतात. तसेच ते बरे होण्याच्या प्रक्रियेतही बाधा येऊ शकते. त्यामुळे अशा स्थितीत केसांना तेल लावू नये.
केस धुतल्यानंतर तेल लावणे टाळा –
केस धुण्यापूर्वी भरपूर तेल लावून चांगले मालिश करावे. केस धुण्यापूर्वी कमीत कमी एक तास आधी तरी केसांना तेल लावावे. मात्र केस धुतल्यानंतर त्यांना लगेच तेल लावणे टाळावे, अन्यथा तुमचे केस चिपचिपीत दिसू लागतील.
तेल लावल्यावर केस बांधणे टाळावे –
केसांना तेल लावून मालिश केल्यावर ते बांधणे टाळावे. तेल मालिशनंतर हेअर क्युटिकल्स उघडतात आणि केस बांधलेले असल्यास ते तुटू शकतात.