नंदुरबार लोकसभा : डॉ. हीना गावितांसमोर काँग्रेसचं आव्हान
नंदुरबार : आगामी लोकसभा निवडणुकीचं काऊंटडाऊन सुरु झालंय. याच पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठी राज्यभरातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघात गेल्या नऊ पंचवार्षिकपासून काँग्रेसचे माणिकराव गावित खासदार होते. जिल्ह्यात तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये राजकीय संघर्ष होता. तत्कालीन राष्ट्रवादीचे नेते विजयकुमार गावित यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश […]
नंदुरबार : आगामी लोकसभा निवडणुकीचं काऊंटडाऊन सुरु झालंय. याच पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठी राज्यभरातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघात गेल्या नऊ पंचवार्षिकपासून काँग्रेसचे माणिकराव गावित खासदार होते. जिल्ह्यात तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये राजकीय संघर्ष होता. तत्कालीन राष्ट्रवादीचे नेते विजयकुमार गावित यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करून त्यांची मुलगी डॉ. हीना विजयकुमार गावित यांना 2014 च्या निवडणुकीत भाजपकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगाणात उतरवलं आणि विजय संपादन केला. अशा पद्धतीने काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात पहिल्यांदा भाजपला यश मिळालं.
नंदुरबार जिल्हा पहिल्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. काँग्रेस नेते कोणत्याही निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ किंवा सत्तेत असताना अनेक योजनांचा शुभारंभ याच मतदारसंघातून करीत असत. त्यामुळे काँग्रेसचे माणिकराव गावित गेल्या 42 वर्षांपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होते. त्याच काळात आघाडी सरकारमध्ये तत्कालीन राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी आदिवासी विकास विभागाच्या योजनांच्या माध्यमातून आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचे जाळं उभारलं आणि त्याच माध्यमातून त्यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनसंपर्काचा फायदा घेतला. 2014 च्या निवडणुकीत हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेला आणि डॉ. विजयकुमार गावित यांनी भाजप प्रवेश करून आपली कन्या डॉ. हीना गावित यांना खासदार केलं. ज्या मतदारसंघात भाजपकडे कार्यकर्ते आणि गाव पातळीवर काम करणारी फळी नसताना गावितांनी आपल्या समर्थकांच्या माध्यामातून विजयश्री खेचून आणत नवीन इतिहास घडवला.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची राजकीय स्थिती
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघात समाविष्ट असलेले सहा विधानसभा मतदार संघही अनुसूचित जमातीसाठी राखीव असून त्यातील चार मतदार संघ नंदुरबार जिल्ह्यातील आहेत, तर दोन धुळे जिल्ह्यातील आहेत.
नंदुरबार विधानसभा मतदारसंघात भाजपचे डॉ विजयकुमार गावित आमदार आहेत. तर शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघात भाजपचे उदेसिंग पाडवी आमदार आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीत अवघ्या 900 मतांनी माजी मंत्री पद्माकर वळवी यांना पराभूत केलं होतं. अक्कलकुवा आक्रणी मतदारसंघातून काँग्रेसचे के. सी. पाडवी विजयी झाले. तर नावापूर मतदारसंघातून काँग्रेसचे जेष्ठ नेते सुरूपसिंग नाईक आमदार आहेत. धुळे जिल्ह्यातील शिरपूर आणि साक्री मतदारसंघात अनुक्रमे काशीराम पावरा आणि साक्रीतून डी. एस. अहिरे हे काँग्रेसचे आमदार आहेत.
विधान परिषदेत या मतदार संघातून आमदार अमरीश भाई पटेल आणि आमदार चंद्रकांत रघुवंशी हे दोघे काँग्रेसचे आमदार आहेत. मतदारसंघातील नंदुरबार जिल्हा परिषद काँग्रेसच्या ताब्यात आहे, तर महत्वाच्या नंदुरबार, शिरपूर, साक्री, नवापूर अक्राणी (धडगाव ) या नगरपालिका एक हाती काँग्रेसच्या ताब्यात आहेत. शहादा पालिकेत नगराध्यक्ष भाजपचा असला तरी बहुमत काँग्रसकडे आहे. तळोदा नगरपालिका भाजपच्या ताब्यात आहे. एकूणच राजकीय स्थिती लक्षात घेता या मतदारसंघात काँग्रस मजबूत असल्याचं चित्र आहे.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची रचना आणि समस्या
नंदुरबार लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील सहा आणि धुळे जिल्ह्यातील दोन तालुक्यांचा समावेश आहे. हे तालुके सातपुडाच्या दुर्गम भागात असून या ठिकाणी अनेक समस्या आहेत. दुर्गम भागात अजूनही रस्ते, दूरसंचार, आरोग्य, शिक्षण, रोजगार, सिंचन, कुपोषण आणि स्थलांतर या मुख्य समस्या आहेत.
विद्यमान खासदारांची जमेची बाजू
विद्यमान खासदार डॉ. हीना गावित यांची जमेची बाजू म्हणजे त्यांनी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून देशात सर्वात जास्त गॅस सिलेंडर आणि दूरसंचार सुविधा उपलब्ध करून दिल्यात. त्याचसोबत रस्ते आणि यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. त्यांचा चांगला जनसंपर्क त्यांची महत्वाची बाब आहे. त्याचसोबत त्यांच्या वडिलांचा सर्मथक वर्ग मोठा आहे. डॉ गावित कोणत्याही पक्षात असले तरी सर्व पक्षीय त्यांचे समर्थक त्यांच्यासोबत असतात हीच खासदार डॉ. हीना गावित यांची जमेची बाजू आहे.
काँग्रेसचे संभाव्य उमेदवार
काँग्रेसकडून या मतदारसंघातून आमदार के सी पाडवी हे मुख्य उमेदवारीचे दावेदार आहेत. त्याचसोबत माजी मंत्री पद्माकर वळवी यांनीही या मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे. मात्र कुणालाही उमेदवारी मिळाली तरी एकसंघपणे राहण्याचे काँग्रेस नेते सांगतात. दोन्ही नेत्यांचा या मतदारसंघातील जनसंपर्क जमेची बाजू आहे.
2009 च्या निवडणुकीत मिळालेली मतं
भाजप डॉ. हीना गावित – 579486
काँग्रेस माणिकराव गावित – 472581
या मतदारसंघातून एक लाखांपेक्षा अधिक मतांनी डॉ. हीना विजय कुमार गावित विजयी झाल्या होत्या. 2014 मध्ये काँग्रेस आणि भाजपात खरी लढत होती.
राजकीय आव्हाने
नंदुरबार आदिवासीबहुल जिल्हा असून जिल्ह्याची एकूण लोकसंख्येच्या 69% लोकसंख्या आदिवासी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील चारही मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव असून या मतदारसंघात अगोदरपासून काँग्रेसचा प्रभाव होता. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी भाजपाचे प्राबल्य वाढले असून काँग्रेस आणि भाजपा काट्याची लढत जिल्ह्यात पाहण्यास मिळते. मात्र या ठिकाणी डॉक्टर गावित परिवारातील गृहकलह पाहण्यास मिळतो. विजयकुमार गावित यांचे दोघे भाऊ माजी आमदार शरद गावित आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित राष्ट्रवादीत असल्याने डॉ. गावितांना या ठिकाणी तेही आव्हान निर्माण करताना दिसतात.
जिल्ह्यात भाजपाने भरारी घेतली असेल तरी भाजपात सरळसरळ दोन गट दिसून येतात. नवे कार्यकर्ते आणि जुने कार्यकर्ते असे हे गट आहेत. डॉ. गावितांनी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते आणि जिल्हा परिषद सदस्य यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर डॉक्टर गावित यांच्या कन्या हिना गावित यांनी लोकसभा निवडणूक लढवत खासदारकी मिळवली. त्यानंतर भाजपाचे आमदार उदेसिंग पाडवी आणि खासदार हिना गावित यांच्यातील दोन गट भाजपात दिसतात.