Gadchiroli Lok sabha result 2019: गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ निकाल
गडचिरोली : एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला गडचिरोली मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे अशोक नेते विजयी झाले आहेत. गडचिरोली-चिमूर मतदारसंघाचे याआधीचे नाव होते केवळ चिमूर. चिमूर ही देशातील क्रांतीची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. आता ही क्रांती या भागातील लोक मोठ्या गंमतीने लोकसभा निवडणुकांच्या बाबतीत सांगतात. 1980 पासून एक अपवाद वगळता एकही स्थानिक […]
गडचिरोली : एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला गडचिरोली मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे अशोक नेते विजयी झाले आहेत. गडचिरोली-चिमूर मतदारसंघाचे याआधीचे नाव होते केवळ चिमूर. चिमूर ही देशातील क्रांतीची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. आता ही क्रांती या भागातील लोक मोठ्या गंमतीने लोकसभा निवडणुकांच्या बाबतीत सांगतात. 1980 पासून एक अपवाद वगळता एकही स्थानिक माणूस इथला खासदार राहिलेला नाही. या मतदारसंघाला ‘पाहुण्यांचा’ मतदारसंघ असे म्हटले जाते. आता पाहुणेच ते. त्यांच्याकडून विकासाची अपेक्षा काय करणार असे चित्र असताना 2009 मध्ये या मतदारसंघातले रहिवासी असलेले काँग्रेसचे खासदार मारोतराव कोवासे निवडून आले होते. गेल्या निवडणुकीत कोवासेऐवजी काँग्रेसकडून उभे असलेल्या डॉ. नामदेव उसेंडीचा पराभव करुन भाजपचे अशोक नेते निवडून आले होते.
पक्ष | उमेदवार | निकाल |
---|---|---|
भाजप/शिवसेना | अशोक नेते (भाजप) | विजयी |
काँग्रेस/ राष्ट्रवादी | नामदेव उसेंडी (काँग्रेस) | पराभूत |
अपक्ष/इतर | डॉ. रमेश गजबे (VBA) | पराभूत |
गडचिरोली… नुसते नाव उच्चारले तरी विदर्भाबाहेरील लोकांचा थरकाप उडतो. देशातील सर्वात मागास जिल्ह्याच्या यादीत अग्रक्रमावर असलेला हा भाग आहे. माओवाद्यांच्या हिंसक कारवाया, तसेच आजही विकासापासून दूर आणि समस्यांनी ग्रासलेले असलेले आदिवासी हे इथले वैशिष्ट्य. इथले आदिवासी हेच विविध राजकीय पक्षांची राजकीय शक्ती. मराठी, हिंदी, गोंड, माडिया आणि तेलगु या भाषा सर्रास प्रचलित असणारा हा भाग विदर्भ छत्तीसगडसह तेलंगणाचा संस्कृतीसंगम आहे. विदर्भाची ‘काशी’ अशी श्रद्धा असणारे हेमाडपंथी मार्कंडा मंदिर आणि चिमूर येथील क्रांतीस्थळ या भागातील भावनिक मुद्दे. लोकशाहीच्या मार्गाने जाण्याची इच्छा असूनही माओवादी बंदुकीचा धाक अशा गर्ते इथले लोक सापडले आहेत. या लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा येतात गडचिरोली, आरमोरी ,अहेरी , आमगाव, चिमुर ब्रम्हपुरी या सहा विधानसभा मतदार संघातून ब्रहमपुरी विधान सभा काँग्रेसचा हाती आहे. उर्वरीत पाच विधानसभेवर भाजपाचे आमदार आहेत.
गडचिरोली चिमूर लोकसभा मतदार संघात एकूण 15 लाख 68 हजार 620 मतदार आहेत. यात पुरुष संख्या 7 लाख 94 हजार 768 तर स्त्रियांची संख्या 7 लाख 73 हजार 850 मतदार आहेत. मागील 2014 च्या निवडणुकीचा तुलनेत 41 हजार 630 मतदार वाढले आहेत.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, पाणी, ग्रामीण रूगणालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, जलशुद्धीकरण प्रकल्पाचे कामे रखडलेली आहेत.
सध्या जिल्ह्यात मेड्डीगट्टा प्रकल्प व सुरजागड लोह खनिच प्रकल्प या साडेचार वर्षात जम्बो पोलीस भर्ती घेण्यात आली नाही आणि रेल्वेमार्ग अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. या चार मुद्द्यांना घेऊन युवा आणि सुशिक्षित बेराजगार वर्ग भाजप पक्षावर नाराज असल्याचे चित्र दिसते.
राज्याचा वनाच्छादित,आदिवासी, नक्षलग्रस्त अशी शेलकी विशेषणे लाभलेल्या या टोकावरच्या भागाकडे देशाचेच काय राज्याचेही कायम दुर्लक्ष होते. वैनगंगा, गोदावरी, गाढवी, पर्लकोटा, इंद्रावती या बारमाही नद्या सिंचन मात्र शून्य. मूळ चंद्रपूर जिल्ह्यापासून 1980 साली वेगळ्या झालेल्या या जिल्ह्यात आता कुठे विकासाचे वारे वाहू लागलेत. मात्र जंगल, आदिवासी अशी ओळख असलेला हा प्रदेश वनोपज उत्पादने व थोडीफार भातशेती या जोरावर पुढे येऊ पाहतो आहे. हा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जमाती अर्थात आदिवासींसाठी राखीव आहे. मात्र मतदार असलेला आदिवासी देशोधडीला आणि बाहेरचे पाहुणे गलेलठ्ठ अशी स्थिती आहे. गडचिरोली, ब्रह्मपुरी व वडसा अशी तीन मोठी शहरे व उर्वरित ग्रामीण अशी या मतदारसंघाची रचना आहे.
गडचिरोली लोकसभा क्षेत्रात 2009 मध्ये 12,85,387 मतदार होते. यात 2014 च्या निवडणुकीत एक ते दीड लाखांची भर पडली आहे.
गडचिरोली लोकसभा मतदारसंघ आदिवासी बहुल आहे. याशिवाय टक्केवारीत 15 टक्के ओबीसी, 50 हजार मुस्लिम, सुमारे एक लाख तेलुगू भाषिक आहेत. निर्वासित बंगाली मतदारांची संख्याही निर्णायक आहे. या क्षेत्रात व्यवसाय आणि राईस मिलसारखे उद्योग हिंदी भाषिकांच्या हाती असल्याने हिंदी भाषिक मतदार लक्षणीय संख्येत आहेत.
गडचिरोली-चिमूर लोकसभा म्हणजे काँग्रेससाठी एक प्रयोगशाळा आहे. या आधीच्या खासदारांच्या नावावर एक नजर टाकली तरी हे स्पष्ट होते. कधी नागपूरचा उमेदवार लाद, कधी रिपाईचा पाहुणा आण असे काँग्रेसने केलेले प्रयोग यशस्वी झाले. या पाहुणेशाहीला कंटाळून भाजपने क्षेत्रात पाय पक्के रोवले आणि एक, दोन नव्हे तर तब्बल तीनदा यश मिळविले. 2009 साली या लोकसभा क्षेञाची पुनर्रचना होऊन हे क्षेत्र अनुसूचित राखीव झाल्यावर काँग्रेसला मारोतराव कोवासेंच्या रुपाने यश मिळाले.
गडचिरोली-चिमूर या लोकसभा क्षेत्राचा खासदारकीचा इतिहास पाहुणे मंडळींच्या आक्रमणाने बराच बोलका झालाय.
1) 1967 साली कॉंग्रेसचे मार्तंड हजरनवीस इथले खासदार होते.
2) यानंतरच्या काळात कॉंग्रेसचे कृष्णराव ठाकूर दोनदा संसदेत गेले
3) 1980 साली पहिल्यांदा नागपूरकर विलास मुत्तेमवार पंजा चिन्हावर लोकसभेत पोहचले.
4) 1984 साली मुत्तेमवार पुन्हा एकदा लकी ठरले.
5) 1989 साली कॉंग्रेसच्या पाहुणे निवडून आणण्याच्या प्रथेला कंटाळून इथल्या जनतेने भाजपचा OBC चेहरा असलेल्या प्रा. महादेवराव शिवणकर यांना लोकसभेत पाठविले.
6) मात्र लगेच 2 वर्षांनी 1991साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे पाहुणे उमेदवार विलास मुत्तेमवार पुन्हा एकदा विजयी ठरले.
7) 1996 साली भाजपने आपला उमेदवार बदलला आणि नामदेवराव दिवठे यांनी कमळ फुलविले.
8) 1998 साली काँग्रेसने आपली प्रयोगशाळा पुन्हा एकदा राबविली. नागपूरकर प्रा. जोगेंद्र कवाडे यांना रिपाईची तिकीट देत दणकेबाज विजय मिळाला.
9) 2004 साली भाजपने महाराष्ट्रातील सत्ता गेल्यावर पुनर्वसन करत प्रा. महादेवराव शिवणकर यांना दिलेली उमेदवारीची खेळी यशस्वी ठरली अन प्रा. शिवणकर लोकसभेत पोहचले.
10) मात्र 2009 साली हा मतदारसंघ राखीव झाला आणि भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांकडे उमेदवारीचे मर्यादित पर्याय शिल्लक राहिले. त्यातील अनुभवी माजी आमदार व कॉंग्रेसच्या कलहाच्या राजकारणात सर्वाना चालणारा उमेदवार म्हणून विद्यमान खासदार मारोतराव कोवासे यांची निवड झाली आणि भाजपला धूळ चारत कोवासे संसदेत पोहचले.
11) मारोतराव कोवासे ऐवजी काँग्रेसचे 2014 मध्ये नामदेव उसेंडीना उमेदवारी दिली. मात्र उसेंडींचा भाजपचे अशोक नेते यानी पराभव करुन चौथ्यांदा हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात गेला आहे.
यंदा 2019 मध्ये गडचिरोली -चिमुर लोकसभा निवडणुकीसाठी पाच उमेदवार रिगणात होते
1) अशोक महादेवराव नेते- भारतीय जनता पार्टी
2) डॉ. नामदेव दल्लुजी उसेंडी- इंडियन नॅशनल काँग्रेस
3) हरीचंद्र नागोजी मंगाम- बहुजन समाज पार्टी
4) देवराव मोनबा नन्नावरे- आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया
5) डॉ. रमेशकुमार बाबुरावजी गजबे- वंचित बहुजन आघाडी