मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटात फाशीची शिक्षा, कैद्याचा तुरुंगात कोरोनाने मृत्यू
आठ एप्रिल रोजी कारागृह प्रशासनाने कैद्यांची कोरोना चाचणी केली असता कमालसह आठ जण पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. (Mumbai train bombings convict dies )
नागपूर : मुंबईत 2006 मध्ये झालेल्या रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात (2006 Mumbai train bombings) फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीचा नागपूरच्या कारागृहात मृत्यू झाला. कोरोना संसर्गानंतर कमाल अहमद मोहम्मद वकील अन्सारी याने प्राण सोडले. कमाल अहमद हा मूळ बिहारचा रहिवासी होता. (2006 Mumbai train bombings convict Kamal Ahmad Ansari dies of Corona in Nagpur Jail)
मुंबईत 2006 मध्ये लोकल रेल्वेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात कमालसह अन्य आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. 2015 मध्ये कमालची रवानगी नागपूर कारागृहात करण्यात आली होती. त्याला विशेष सेलमध्ये ठेवण्यात आले होते.
उपचारादरम्यान मृत्यू
आठ एप्रिल रोजी कारागृह प्रशासनाने कैद्यांची कोरोना चाचणी केली असता कमालसह आठ जण पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. त्यानंतर कारागृह प्रशासनाने त्याला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान सोमवारी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
मुंबईत सात साखळी स्फोट
11 जुलै 2006 रोजी मुंबईत सायंकाळी 6.24 ते सायंकाळी 6.35 या दरम्यान एकामागून एक सात स्फोट झाले होत. हे सर्व स्फोट मुंबईच्या पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या प्रथम श्रेणीच्या डब्यात झाले होते. खार, वांद्रे, जोगेश्वरी, माहीम, बोरिवली, माटुंगा आणि मीरा-भाईंदर रेल्वे स्थानकांजवळ सात साखळी स्फोट घडवण्यात आले होते. 11 मिनिटांच्या काळात घडलेल्या स्फोटांत 189 जणांना प्राण गमवावे लागले, तर 817 जण जखमी झाले.
शिक्षा काय
मुंबई साखळी बॉम्बस्फोट खटल्यातील पाच आरोपींना 30 सप्टेंबर 2015 रोजी विशेष मोक्का न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची, तर अन्य सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
युसूफ मेमनचा नाशिक कारागृहात मृत्यू
याआधी, 1992-93 च्या मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी युसूफ मेमनचा (Yusuf Memon Death) नाशिकच्या कारागृहात मृत्यू झाला होता. तो 2018 पासून नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. मात्र जून 2020 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने युसूफ मेमनचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. युसूफ मेमन हा टायगर मेमनचा भाऊ होता.
1992-93 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. या बॉम्बस्फोटात सुमारे 800 जणांना मृत्यू झाला होता. तर काही हजार नागरिक जखमी झाले होते. या भयावह बॉम्बस्फोटाचा सूत्रधार हा टायगर मेमन होता. मेमन हा माहीम येथे राहत होता. त्याच्या घरात शक्तीशाली बॉम्ब बनवण्यात आले होते. यामुळे या खटल्यात टायगर मेमन याचं अख्ख कुटुंब हे आरोपी होते.
संबंधित बातम्या :
Yusuf Memon Death | मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी युसूफ मेमनचा नाशिक जेलमध्ये मृत्यू
(2006 Mumbai train bombings convict Kamal Ahmad Ansari dies of Corona in Nagpur Jail)