९७ वे साहित्य संमेलन सानेगुरुजी यांच्या कर्मभूमीत, महामंडळाच्या बैठकीत अमळनेरच्या नावावर शिक्कामोर्तब
marathi sahitya sammelan : साने गुरुजी यांच्या कर्मभूमीत पुन्हा साहित्य रसिकांचा मेळा भरणार आहे. ९७ वे साहित्य संमेलन साने गुरुजी यांच्या कर्मभूमीत घेण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. हे संमेलन ५०च्या दशकानंतर अमळनेरमध्ये पाहिल्यांदा होत आहे.
पुणे : ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होणार आहे. पुण्यातील साहित्य महामंडळाच्या झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या संमेलनासाठी सातारा, सांगलीमधील औदुंबर आणि जळगाव जिल्ह्यात अमळनेर शहरांमध्ये स्पर्धा होती. तसेच जालनाचाही प्रस्ताव होता. यातून अखेर अमळनेरची निवड करण्यात आली. अमळनेर साने गुरुजी यांची कर्मभूमी आहे. 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्यात झाले होते.
समितीची केली होती स्थापना
साहित्य संमेलनासाठी महामंडळातर्फे स्थळ निवड समिती गठित करण्यात आली होती. या समितीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष रमेश वंसकर, प्रदीप दाते, डॉ. किरण सगर, सुनिताराजे पवार आणि डॉ. नरेंद्र पाठक हे होती. या समितीने औदुंबर आणि अमळनेर येथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. त्यानंतर सर्व संमतीने मराठी वाङमय मंडळ, अमळनेर या संस्थेची शिफारस केली. मग महामंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला.
संमेलन यशस्वी होणार- जोशी
अमळनेर तालुक्याला साहित्य, संस्कृती, इतिहास आहे. अमळनेर शहराला औद्योगिक विकासाची मोठी परंपरा होती. यामुळे साऱ्यांच्या सहकार्याने अखिल भारतीय साहित्य संमेलनाची जबाबदारी मराठी वाङमय मंडळ पेलायला सक्षम आहे. हे संमेलन यशस्वी होईल, असे अमळनेर, मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी सांगितले.
अमळनेरमध्ये दुसऱ्यांदा संमेलन
१८७८ मध्ये पहिले संमेलन पुणे शहरात झाले होते. त्या संमेलनाचे अध्यक्ष न्या. महादेव गोविंद रानडे होते. जळगाव जिल्ह्यात १९३६ मध्ये संमेलन झाले होते. माधव त्रिंबक पटवर्धन त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. १९५२ मध्ये अमळनेरमध्ये कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन झाले होते. त्यानंतर आता अमळनेर शहरात दुसऱ्यांदा हे संमेलन होत आहे. जळगाव शहरात १९८४ मध्ये संमेलन झाले होते. त्या संमेलनाचे अध्यक्षस्थान शंकर रामचंद्र खरात यांनी भूषविले होते. म्हणजेच १९८४ आता हे संमेलन जळगाव जिल्ह्यात होत आहे.