Birth In Ambulance : उल्हासनगर शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचा हलगर्जीपणा; वॉर्डबॉय, स्ट्रेचर नाही, महिलेची झाली रुग्णवाहिकेत प्रसूती
उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात आजूबाजूच्या ग्रामीण भागातून अनेक रुग्ण गंभीर परिस्थितीत येत असतात. मात्र त्यांना बहुतांशी वेळा मुंबईलाच पाठवलं जातं. रात्रीच्या वेळी वॉर्डबॉय, डॉक्टर हे ड्युटीवर असूनही हॉस्पिटलमध्ये हजर नसतात
उल्हासनगर : राज्यात चांगली आरोग्य व्यवस्था आहे असे राजकारणी आणि आपण म्हणत असतो. तसेच अनेक बाबतीत ते स्पष्टही झाले आहे. मात्र राज्यतील अरोग्य विभागावर (Department of Health) प्रश्न चिन्ह उठणाऱ्या काही घटनाही घडल्या आहेत. ज्यामुळे अनेकांना त्यांचा जीव गमावावा लागला आहे. असे राज्यात चित्र असतानाच पुन्हा एकदा अरोग्य विभागावर प्रश्न उभे राहण्याचे चिन्ह दिसत आहे. येथील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचा (Government Central Hospital) हलगर्जीपणा आज चव्हाट्यावर आला. तेथे रूग्णालयात वॉर्डबॉय, स्ट्रेचर नसल्याच्या कारणाने एका महिलेची चक्क रुग्णवाहिकेत (Ambulance) प्रसूती करावी लागली आहे. ही मंगळवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास उडली. त्यानंतर शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाच्या हलगर्जीपणावर चर्चा सुरू झाली आहे. तर दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ही होत आहे.
वॉर्डबॉय किंवा स्ट्रेचर नाही
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुरबाडच्या चिरड गावात राहणाऱ्या वैशाली बाळू मुकणे यांना प्रसूतीसाठी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात आणण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयाबाहेरच त्यांना प्रसूतिवेदना सुरू झाल्या. यावेळी त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी कोणताही वॉर्डबॉय किंवा स्ट्रेचर तिथे उपलब्ध नव्हतं. याचवेळी तिथे उल्हासनगरच्या 108 रुग्णवाहिकेत असलेले डॉ. रमेश गंगाधरे यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यामुळे त्यांनी या महिलेला आपल्या रुग्णवाहिकेत घेऊन रुग्णवाहिकेत तिची प्रसूती केली.
108 रुग्णवाहिकेच्या डॉक्टरांची तत्परता
108 रुग्णवाहिकेच्या डॉक्टरांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे या महिलेला पुत्ररत्न प्राप्त झालं आहे. मात्र त्यावेळी जर ती रुग्णवाहिका तिथे नसती तर या महिलेचं काय झालं असतं? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात आजूबाजूच्या ग्रामीण भागातून अनेक रुग्ण गंभीर परिस्थितीत येत असतात. मात्र त्यांना बहुतांशी वेळा मुंबईलाच पाठवलं जातं. रात्रीच्या वेळी वॉर्डबॉय, डॉक्टर हे ड्युटीवर असूनही हॉस्पिटलमध्ये हजर नसतात, असे प्रकार अनेकदा समोर आले असून याकडे रुग्णालय प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.