Aditya thackray : कोरोनायोद्ध्यांना लसीचा तिसरा डोस द्या, आदित्य ठाकरेंचं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र
ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, अशांनाही ओमिक्रॉनची लागण झाल्याचे अनेक रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे किमान प्राथमिकतेनुसार कोरोनायोध्यांना तरी तिसरा डोस द्यावा अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.

मुंबई : राज्यात ओमिक्रॉनने दस्तक दिल्याने राज्य सरकार कामाला लागलं आहे. तसेच दोन डोस घेतलेल्यांनाही ओमिक्रॉनची लागण झाल्याचं समोर आल्यानं कोरोनायोद्ध्यांना तिसरा डोस द्यायचा का? याबाबत विचार सुरू आहे. तसेच लसीकरणाच्या दोन डोसमधील कालावधीही कमी करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यावरून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांना एक पत्र लिहलं आहे. त्यातून त्यांनी विविध मागण्या केल्या आहेत.
कोरोनायोध्यांना तिसरा डोस देण्याची मागणी
जगात, देशात आणि राज्यात ओमिक्रॉनचा प्रसार अत्यंत वेगाने होत आहे. ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, अशांनाही ओमिक्रॉनची लागण झाल्याचे अनेक रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे किमान प्राथमिकतेनुसार कोरोनायोद्ध्यांना तरी तिसरा डोस द्यावा अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.
लसीकरणाची वयोमर्यादा कमी करण्याचीही मागणी
आता राज्यात 18 वर्षावरील नागरिकांचं लसीकरण सुरू आहे, मात्र लहान मुलांना कोरोना होण्याचं प्रमाण वाढलं आहे. हे विचारात घेऊन लसीकरणाची वयोमर्यादा 18 वरून 15 वर्षे करावी अशी मागणी आदित्या ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे. 18 वर्षे आणि 15 वर्षे वयाच्या मुलामध्ये जास्त फरक नसतो, त्यामुळे त्यांना लस देणे सुरक्षित आणि सोयीचे असल्याचं आदित्य ठाकरे यांचं म्हणणे आहे.
लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी करणे
तसेच त्यांनी लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी करता येऊ शकते, असेही सुचवले आहे. जे विद्यार्थी बाहेरील देशात शिक्षणासाठी जात आहेत, त्यांचा लसीच्या दोन डोसमधील कालावधी कमी करण्यात आला आहे. त्याच धरतीवर सर्व नागरिकांच्या लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी करता येईल असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. त्यामुळे लसीकरणाला वेग येण्यास आणखी मदत होणार आहे. आदित्य ठाकरेंच्या या मागण्यांवर आता केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया काय निर्णय घेतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.