Nitin Desai | महाराष्ट्र सरकार कर्जतचा एन.डी.स्टुडिओ ताब्यात घेणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले….
Nitin Desai | नितीन देसाई यांच्या मृत्यूनंतर त्यांनी कर्जत येथे उभारलेला एन.डी.स्टुडिओ ताब्यात घेण्याची मागणी होत आहे. या स्टुडिओमुळे नितीन देसाई यांच्यावर कर्ज होता. हा स्टुडिओ सोडवण्याचा ते अखेरपर्यंत प्रयत्न करत होते.
मुंबई : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचं काल निधन झालं. त्यांनी कर्जतच्या एन.डी.स्टुडिओमध्ये आपलं जीवन संपवलं. आज महाराष्ट्राच्या विधिमंडळात नितीन देसाई यांच्या पश्चात चर्चा झाली. यावेळी राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. नितीन देसाई यांच्या मृत्यूबद्दल अनेकांच्या मनात संशय आहे. त्यांच्यावर कर्ज होतं. त्यामुळे कर्ज वसुलीसाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात होता का? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.
भाजपा आमदार आशिष शेलार यांनी नितीन देसाई यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस आमदार अशोक चव्हाण यांनी आज सभागृहात नितीन देसाई यांच्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.
स्टुडिओचा लिलाव करु नका, काँग्रेस आमदाराची मागणी
“नितीन देसाई यांनी मराठी चित्रपटात वेगळी छाप उमटवली. चांगला स्टुडिओ उभारला. चांगलं काम नितीनजी यांनी केलं. जे पाहतोय, ऐकतोय ऑडिओ क्लिपमधून त्यांनी पुरावे दिले आहेत. कर्ज वसुलीसाठी लोक जाचक पद्धतीने त्यांच्या मागे लागले होते का? असं इम्प्रेशन तयार झालय. आशिष शेलार यांनी मागणी केल्याप्रमाणे सखोल चौकशी झाली पाहिजे. लिलाव न करता शासनाने हा स्टुड़िओ ताब्यात घ्यावा, हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल” असं अशोक चव्हाण म्हणाले.
वाराणसीचे घाट सुंदर बनवण्यात नितीन देसाई यांचं योगदान
“नितीन देसाई हे खऱ्या अर्थाने चित्रपट सृष्टीतील एक महत्त्वाच नाव होतं. कला दिग्दर्शनात त्यांनी आपलं बस्तान बसवलं. मराठी माणसाला अभिमान वाटावा असं काम त्यांनी केलं. केवळ हिंदी चित्रपटच नाही, अनेक राजकीय पक्षांचे मोठमोठे कार्यक्रम व्हायचे, त्या कार्यक्रमात कुठली थीम असली पाहिजे, यासाठी त्यांना बोलावल जायचं, ते थीम सुद्धा तयार करुन द्यायचे. दिल्लीमधील चित्ररथ आपण त्यांच्याच माध्यमातून तयार करायचो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतील घाट सुंदर बनवले, त्यामध्ये त्यांच योगदान आहे. एका अतिशय हरहुन्नरी कलावंत, कलादिग्दर्शकाचा मृत्यू अतिशय दुर्देवी आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सखोल चौकशी होणार, गृहमंत्र्यांची घोषणा
“ही गोष्ट खरी आहे, त्यांच्यावर कर्ज होतं. स्टुडिओ गहाण ठेवला होता, निकाल त्यांच्याविरोधात गेला होता. स्टुडिओ सोडवण्याचा ते प्रयत्न करत होते. कुठे जाणीवपूर्वक स्टुडिओ ताब्यात घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला का? नियमाच्या बाहेर जाऊन व्याज लावून अडकवण्याचा प्रयत्न झाला का? याची सखोल चौकशी सरकार करेल” असं राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं. महाराष्ट्र सरकार स्टुडिओ ताब्यात घेणार का?
“नितीन देसाई यांची आठवण म्हणून एनडी स्टुडिओच कसं संवर्धन करता येईल, तो ताब्यात घेता येईल का? या विषयी कायदेशीर बाबी तपासल्या जातील. आत्ताच त्या बद्दल घोषणा करता येणार नाही” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.