Eknath Shinde: आमदार, खासदारांनंतर आता एकनाथ शिंदेंचा शिवसेनेचे नगरसेवक, जि. प. सदस्य फोडण्याचा प्रयत्न, काय आहे कारण जाणून घ्या..
शिवसेनेचे आमदार, खासदार आणि सहयोगी अपक्षांच्या फुटीनंतर आता शिवसेना पक्षात राज्यात थेट फूट पाडण्याचे एकनाथ शिंदे गटाचे प्रयत्न सुरु झाले आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेतील हे बंड राजकीयदृष्ट्या शिवसेनेला बरेच महाग पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
मुंबई – शिवसेनेचे 37 च्या वर आणि सहयोगी अपक्ष आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी फोडल्यानंतर, आता शिवसेनेला काळजी लागली आहे ती महापालिकांतील नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांची. आता आमदारांनंतर शिवसेनेचे नगरसेवक (Shivsena corporators)आणि जि. प. सदस्य फुटू नयेत यासाठी शिवसेनेचं डॅमेज कंट्रोल सुरु झालं आहे, त्याचसाठी सगळ्या जिल्हा प्रमुखांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)शुक्रवारी दुपारी तातडीनं संवाद साधणार आहेत. तसेच नगरसेवक फुटू नयेत म्हणून गुरुवारी मुंबईतील विभाग प्रमुखांची बैठकही पार पडलेली आहे. शिवसेनेचे आमदार, खासदार आणि सहयोगी अपक्षांच्या फुटीनंतर आता शिवसेना पक्षात राज्यात थेट फूट पाडण्याचे एकनाथ शिंदे गटाचे प्रयत्न सुरु झाले आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेतील हे बंड राजकीयदृष्ट्या शिवसेनेला बरेच महाग पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
नगरसेवक, जि. प. सदस्य फोडण्याची काय गरज?
एकनाथ शिंदे यांच्याकडे आत्ता 50 हून अधिक आमदार असल्याचे सांगण्यात येते आहे. त्यात शिवसेनेचे 37 हून जास्त, तसेच इतर शिवसेनेचे सहयोगी पक्ष आणि अपक्ष आमदारांचा समावेश आहे. अशा स्थितीत दोन तृतियांश पक्ष फोडून स्वतंत्र गट स्थापन करण्याचा आणि तीच शिवसेना आहे, असा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न आहे. मात्र त्यासाठी पक्षात संपूर्ण राज्यात फूट पडलेली आहे, हे कायदेशीर दृष्ट्या दाखवावे लागणार आहे. त्यामुळेच आता एकनाथ शिंदे गटाकडून पुढची रणनीती म्हणून नगरसेवक, पंचायत समित्या. जिल्हा परिषद सदस्य फोडण्याचा प्रयत्न सुरु झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई, ठाण्यातून शिवसेनेचे नगरसेवक फुटण्याची भीती
राज्यात सत्ताबदल होण्याची शक्यता दिसते आहे, तसेच शिवसेनेची ताकद असलेले जमिनीवरील आमदार हे सध्या एकनाथ शिंदेंसोबत दिसत आहेत. अशा स्थितीत महापालिका निवडणुकाही तोंडावर आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा देण्यासाठी मुंबई, ठाण्यातीलही अनेक नगरसेवक शिंदे गटाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. असे झाल्यास राज्यात इतरही ठिकाणी फूट दिसेल. तसेच ही पाठिंब्याची पत्रे मिळाल्यानंतर स्वतंत्र गट आणि मूळ शिवसेना आपलीच, हा एकनाथ शिंदे यांचा दावा यशस्वी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शिवसेनेकडूनही डॅमेज कंट्रोल
ही परिस्थिती उद्भवू नये, यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. गुरुवारच्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत आणि शुक्रवारच्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत याचीच काळजी घेण्याचे आदेश पक्षातील पदाधिकाऱ्यांना देण्यात येतील, अशी शक्यता आहे. मुख्यमंत्री आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे स्वता त्यांच्याशी संवाद साधत आहेत.