MNS : काश्मीरच्या बुकिंग रद्द होत असताना मनसेने उचललं मोठ पाऊल, संदीप देशपांडेंनी दिली माहिती
MNS : "एका काश्मिरी युवक सांगत होता, त्याची एक गाडी होती. पर्यटक येतात म्हणून त्याने अजून दोन गाड्या घेतल्या. आता स्थिती अशी आहे की, पर्यटन बंद झालं, तर दोन गाड्यांचे हफ्ते कसे भरु? काश्मीर पर्यटनावर अवलंबून आहे, तेच बंद पाडण्याचा अतिरेक्यांचा, पाकिस्तानचा डाव आहे"

पेहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरच्या बुकिंग रद्द होण्यास सुरुवात झाली आहे. काश्मीरच्या पेहेलगाममध्ये मंगळवारी दुपारी पर्यटकांवर हल्ला करण्यात आला. यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला. अजूनही अनेक पर्यटक काश्मीरमध्ये अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पावलं उचलली आहेत. या हल्ल्यामुळे काश्मीरच्या नियोजित सहली रद्द करण्याच प्रमाण वाढलं आहे. पर्यटन हा काश्मीरच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. हीच बाब लक्षात घेऊन मनसेने काश्मीरची सहल आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. “ज्यांना काश्मीरला जायचं आहे, त्यांनी संपर्क साधावा. काश्मीर सहलीची सुरुवात आम्ही आमच्यापासून करतोय. काश्मीर भारताच अविभाज्य अंग आहे, तिथे जायला आम्ही घाबरत नाही. पर्यटकांना भारतात कुठेही जाण्याची भिती नाही वाटली पाहिजे. हाच संदेश आम्हाला द्यायचा आहे” असं मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे म्हणाले.
“तुम्ही जिओ पॉलिटिक्स बघितलं, तर अतिरेक्यांना कधीतरी काश्मीरमध्ये मदत मिळायची. ती आता बंद झाली आहे, याचं कारण इन्फ्रास्ट्रक्चर, उद्योग-धंदे वाढले. रोजगार निर्माण झाले” असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं. “एका काश्मिरी युवक सांगत होता, त्याची एक गाडी होती. पर्यटक येतात म्हणून त्याने अजून दोन गाड्या घेतल्या. आता स्थिती अशी आहे की, पर्यटन बंद झालं, तर दोन गाड्यांचे हफ्ते कसे भरु? काश्मीर पर्यटनावर अवलंबून आहे, तेच बंद पाडण्याचा अतिरेक्यांचा, पाकिस्तानचा डाव आहे. तो हाणून पाडायचा असेल, तर देश म्हणून एकत्र येऊन काश्मीरमध्ये पर्यटन केलं पाहिजे. हेच दहशतवादाला उत्तर आहे. कुठल्याही परिस्थितीत भारतातील सगळे नागरिक एकत्र येऊ शकतात हा संदेश गेला पाहिजे” असं संदीप देशपांडे म्हणाले.
‘आपल्या सैन्यावर, आपल्या लोकांवर विश्वास ठेवा’
“तुमचा मनसुबा कामयाब होणार नाही. दहशतवादाला पर्यटनाने उत्तर देणार. स्वत:पासून आम्ही सुरुवात करतोय. लोकांना आवाहन करतो की, त्यांनी काश्मीरला जावं. आपल्या सैन्यावर, आपल्या लोकांवर विश्वास ठेवला पाहिजे” असं संदीप देशपांडे म्हणाले. मनसेच्या या काश्मीर सहलीमध्ये ज्यांना कोणाला यायचं आहे, त्यांना घेऊन जाणार असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं. “काही एअरलाइन्स कंपन्या अव्वाच्या सव्वा श्रीनगर-मुंबई भाडं आकारत आहेत हे चुकीच आहे, तुम्ही अशाने देश जोडणार का? अशा परिस्थितीत एअरलाइन्स कंपन्यांना असं वागण शोभत नाही” असं संदीप देशपांडे म्हणाले.
