Sanjay Rathod : राजीनामा देऊन संजय राठोड पोहरादेवीला शरण जाणार?
Sanjay Rathod : संजय राठोड हे वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजेचे आराध्य दैवत असलेल्या पोहरादेवीला (Pohradevi) शरण जाण्याची शक्यता आहे.
मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात आरोपांच्या केंद्रस्थानी असलेले शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod Banjara Poharadevi) यांनी मातोश्रीवर राजीनामा पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अद्याप संजय राठोड यांनी याप्रकरणात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पूजा चव्हाणने 7 फेब्रुवारीला पुण्यात आत्महत्या केली. त्यानंतर संजय राठोड यांच्या आवाजातील कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या. यानंतर भाजपने थेट संजय राठोड यांचं नाव घेऊन, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलीच, त्याशिवाय त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. (After resignation Sanjay Rathod to surrender to Pohardevi banjara?)
या पार्श्वभूमीवर संजय राठोड यांनी आज राजीनामा पाठवल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. संजय राठोड हे 7 फेब्रुवारीपासून नॉट रिचेबल आहेत. गेल्या चार दिवसांपासून त्यांची गाडी मंत्रालयाच्या पार्किंगमध्ये उभी आहे. संजय राठोड यांचा कोणाशीच संपर्क नाही. माध्यमांनीही त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्कच होत नाही.
पोहरादेवीला शरण?
दरम्यान, नॉट रिचेबल असलेले संजय राठोड हे वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजेचे आराध्य दैवत असलेल्या पोहरादेवीला (Pohradevi) शरण जाण्याची शक्यता आहेत. कारण पोहरादेवी हे बंजारा समाजाची (Banjara) काशी समजली जाते. इथे येऊन संजय राठोड आपली भूमिका मांडण्याची चिन्हं आहेत. नुकतीच सेवालाल जयंती झाली. यावेळी बंजारा समाजाने संजय राठोड यांच्या पाठिशी उभं राहण्याचा निर्णय घेतला.
पोहरादेवीचं महत्व काय?
वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी हे ठिकाण बंजारा समाज बांधवांची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी असलेल्या संत सेवालाल महाराज, आई जगदंबामाता आणि राष्ट्रीय संत डॉ. रामराव महाराज यांच्या दर्शनासाठी देश विदेशातून भाविक येथे हजेरी लावलात.
पोहरादेवी येथे बंजारा समाजचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची समाधी आहे. नुकतंच ऑक्टोबर महिन्यात संत सेवालाल महाराजांचे वंशज आणि बंजारा समाजाचे धर्मगुरु डॉ. रामराव महाराज यांचं निधन झालं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते दिग्गजांनी रामराव महारांजांना श्रद्धांजली अर्पण केली होती.
डॉ. रामराव महाराज यांचे मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले होते. त्यानंतर त्यांचे पार्थिव वाशिमच्या मालेगाव येथे आणण्यात आले. त्यानंतर त्यांच्या मूळगावी पोहरादेवी येथे त्यांचे पार्थिव आणण्यात आले. त्यावेळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी एकच गर्दी झाली. संत सेवालाल यांचे वंशज असल्याने रामरावबापू महाराज यांच्यावर बंजारा समाजाची अपार श्रध्दा होती. इतरही समाजात त्यांना मान होता.
रामराव महाराजांनी 1948 मध्ये पोहरादेवी येथील गादीवर बसल्यानंतर अन्नत्याग केला. त्यानंतर ते फक्त कडूनिंब, दूध आणि फळांचे सेवन करत होते. गेल्या काही महिन्यांपासून दूध घेतानाही त्यांना त्रास जाणवत होता. त्यामुळे ते फक्त कडूनिंब आणि ज्यूस घेत होते. मात्र त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्या ठिकाणी त्यांची प्राणज्योत मालवली.
बंजारा समाज पाठिशी
दरम्यान, संजय राठोड यांच्या पाठिशी बंजार समाज उभा असल्याचं त्यांचे प्रतिनिधी सांगतात. बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी संस्थानच्या महंतांची काल बैठक पार पडली. यावेळी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विरोधकांचं लक्ष्य ठरलेले बंजारा समाजाचे नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच विरोधकांनी समाजाची बदनामी केल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.
बंजारा समाजाची बदनामी नको
दरम्यान, पूजा चव्हाण अत्महत्याप्रकरणात बंजारा समाजाचे नेते वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर करून, बंजारा समाजाची बदनामी होत आहे. यामुळं वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी इथल्या महंतांनी बैठक घेऊन संजय राठोड यांच्या पाठीशी खंबीरपणे समाज उभा असल्याचं सांगितलं. तसंच समाजाची बदनामी थांबवावी असे आवाहन केले होते.आज त्या अनुषंगाने संजय राठोड यांच्या समर्थानात यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस इथं बंजारा समाज समन्वय समितीच्या वतीने पोहरादेवी इथल्या सुनील महाराज आणि जितेंद्र महाराज यांच्या नेतृत्वाखाली वसंत शास्त्री पुतळा जवळून निषेध रॅली काढण्यात येणार आहे.
संजय राठोड कुठे आहेत?
पूजाने रविवारी 7 फेब्रुवारीला आत्महत्या केल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून वनमंत्री संजय राठोड नॉट रिचेबल आहेत. त्यांनी या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा त्यांच्यावरील आरोपही खोडून काढले नाहीत. त्यामुळे राठोड यांच्या भोवतीचा संशय अधिकच वाढला आहे.तसेच गेल्या दोन दिवसांपासून त्यांची गाडी (MH 01DP 7585) मंत्रालयाच्या प्रांगणात उभी आहे. त्यामुळे राठोड गाडी सोडून अज्ञातवासात कुठे निघून गेले? असा सवाल केला जात आहे.
संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारला?
निष्पक्ष चौकशीसाठी संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. संजय राठोड यांनी मातोश्रीवर राजीनामा पाठवला आहे.
(After resignation Sanjay Rathod to surrender to Pohardevi banjara?)
संबंधित बातम्या
देशभरातील बंजारा समाजावर शोककळा, धर्मगुरु संत रामराव महाराजांचे निधन