‘मला नाही अब्रू, मी कशाला घाबरू?’, उद्धव ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघात
"पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वप्न बघत आहेत. 10 वर्ष झाले. कधी पूर्ण होणार? भाजपात लायकी नाही म्हणून तुम्हाला दुसऱ्याचा पक्ष फोडावा लागतो. माझा पक्ष फोडला, नितीश कुमार फोडले, अशोक चव्हाण फोडले, स्वामिनाथन फोडले", असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.
चंदन पुजाधिकारी, Tv9 प्रतिनिधी, अहमदनगर | 13 फेब्रुवारी 2024 : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. “फडतूस, कलंक, नालायक बोलून झालं पण फडणवीसांना फरक पडत नाही. मला नाही अब्रू, मी कशाला घाबरू? असं फडणवीसांच्या बाबतीत झालंय. निर्लज्जम सदा सुखी असं फडणवीस यांचं झालंय. भाजपची मस्ती उतरवावी लागेल”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. “कोस्टल रोड हे माझं स्वप्न आहे. अजून अर्धवट आहे. पण त्यांचं उद्घाटन करायला मोदी येत आहेत. आम्ही केलेल्या कामाची साक्ष देण्यासाठी मोदी येत आहेत. आम्ही जळके नाहीत. 50 टक्के आरक्षण मिळताहेत का? उज्ज्वला योजनेतून किती सिलेंडर मिळाले? गावात विचारा किती रोजगार मिळाले?”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
“मी महाराष्ट्रभर फिरतोय. माझ्या महाराष्ट्राच्या कुटुंबाशी संवाद करायला आलोय. धन्यवाद करायला आलोय. मुख्यमंत्री असताना फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधला. कोरोना नाही पण वेगळा व्हायरस फोफावतोय. हुकूमशहाचा व्हायरस फोफावतोय. भाजप आणि आरएसएसच्या कार्यकर्त्यांना आज एक मोठा धक्का बसला आहे. एक भ्रष्टाचारी भाजपात आला हा भाजपला धक्का आहे. हा शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला धक्का नाही. सडलेले पानं झडत आहेत. अशोक चव्हानांबद्दल बोलताना भाजपच्या लोकांची त्रेधातिरपीट होतेय. भाजपात प्रवेश केल्यावर ईडी लागणार नाही ही मोदी गॅरंटी आहे. अशोकरावांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जायला हवं होतं की भाजपच्या दारात?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
‘भेकड असतील त्यांनी अजूनही भ्रष्ट पार्टीत जा’
“मी मन की बात करत नाही. मी जन की बात ऐकतो. इकडे पंतप्रधान येऊन कितीही गॅरंटी दिली तरी फरक पडणार नाही. जे भेकड असतील त्यांनी अजूनही भ्रष्ट पार्टीत जा. मला काय व्हायचं यासाठी मी मैदानात नाही, तर तुमच्यासाठी मी मैदानात उतरलो आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘भाजपात लायकी नाही म्हणून तुम्हाला दुसऱ्याचा पक्ष फोडावा लागतो’
“पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वप्न बघत आहेत. 10 वर्ष झाले. कधी पूर्ण होणार? भाजपात लायकी नाही म्हणून तुम्हाला दुसऱ्याचा पक्ष फोडावा लागतो. माझा पक्ष फोडला, नितीश कुमार फोडले, अशोक चव्हाण फोडले, स्वामिनाथन फोडले. दिल्लीत वादळ घोंगावत आहे. मोदी शेतकऱ्यांच्या घरात जाऊन जेवतात. मग शेतकऱ्यांना तुमच्या घरात येऊ का देत नाही? पूर्ण मिलिटरी लावली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या डोळ्याला आश्रू आहेत, त्यांच्यावरच आश्रू धुराचा वापर? शेतकऱ्यांनी शेतकरी म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे. देशातील 80 कोटी लोकांना फुकट धान्य. हे शेतकऱ्यांचं धान्य आहे मोदींच्या बागेतील नाही?”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.