धक्कादायक : एमजीएम रुग्णालयात अतिदक्षता विभागातील वातानुकूलित यंत्रणा बंद; आरोग्य विभागाकडून रुग्णालयाला नोटीस
जे गंभीर आजाराने त्रस्त रूग्ण आहेत त्यांच्यासाठी अतिदक्षता विभाग (आयसीयू) तयार करण्यात आला आहे. तर या सुसज्ज अशा अतिदक्षता विभागाला वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात आली आहे.
पनवेल : कामोठे एमजीएम रुग्णालय (Kamothe MGM Hospital) वरचेवर चर्चेत असते. याच्या आधी हे रूग्णालय एका इंजेक्शननेच एका बालकाच्या मृत्यूमुळे बातम्यांमध्ये आले होते. तर याच्याआधी कोरोना काळात येथून एक कोरोनाबाधीत पळून गेला होता. त्यावेळी कामोठे एमजीएम रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले होते. आता ही असाच कामोठे एमजीएम रुग्णालयाचा आंधळा कारभार समोर आला असून अनेक रूग्णांना त्याचा त्रास सहन करावा लागला आहे. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील (Intensive Care Unit) वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागला आहे. याबाबत पनवेल महापालिकेच्या (Panvel Municipal Corporation) आरोग्य विभागाकडून एमजीएम रुग्णालयास नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच खुलासा मागितला आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रातील कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. तर आजाराच्या प्रकाराप्रकाराने वेगवेगळे विभाग येथे तयार करण्यात आले आहेत. तर जे गंभीर आजाराने त्रस्त रूग्ण आहेत त्यांच्यासाठी अतिदक्षता विभाग (आयसीयू) तयार करण्यात आला आहे.
तर या सुसज्ज अशा अतिदक्षता विभागाला वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात आली आहे. जी कायमस्वरूपी कार्यान्वित असणे आवश्यक असते. मात्र ती बंद असल्याचे पनवेल पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिसून आले आहे. पनवेल पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी 13 मे रोजी पाहणी केली होती. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला होता. तर यावेळी दाखल रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागल्याचेही समोर आले होते. याप्रकरणी महापालिका आरोग्य विभागाने रुग्णालय प्रशासनास नोटीस बजावली असून खुलासा मागितला आहे.