‘द्रौपदीचा विचार करावा लागतो की काय?’, मुलींच्या जन्मदरावर बोलताना अजित पवारांचं अजब विधान; हातजोडत…
"पुढे द्रौपदीचा विचार करावा लागतो की काय? अशी स्थिती येईल." मुलींच्या जन्मदरावर बोलताना अजित पवारांनी हे वक्तव्य केलं. "गंमतीचा भाग सोडा, मला कुणाचा अपमान करायचा नाही", असंही अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं. अनेक जिल्ह्यांमध्ये मुला-मुलींच्या जन्मदरात तफावत आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात आज एक अजबच विधान केलं आहे. अजित पवार स्त्री-पुरुषांच्या जन्मदराच्या वाढत असलेल्या विषमतेवर बोलत होते. पण यावेळी त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची आता सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. अर्थात संबंधित वक्तव्य केल्यानंतर अजित पवारांना आपल्या चुकीची जाणीवही झाली. त्यांनी लगेच हात जोडत माफीदेखील मागितली. पण तसेच आपला अपमान करण्याचा उद्देश नव्हता, असं अजित पवार म्हणाले. पण उपमुख्यमत्र्यांनी अशाप्रकारचं वक्तव्य करणं यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाभारतात द्रौपदी ही पाच पांडवांची पत्नी होती. द्रौपदी पाच पांडवांची पत्नी होण्यामागचं कारण वेगळं होतं. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या वक्तव्यात द्रौपदीचा उल्लेख केल्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला. यानंतर अजित पवार यांनी आपली चूक दुरुस्त करत आपल्याला द्रौपदीचा अपमान करायचा नव्हता, असं ते म्हणाले.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
“आम्ही मधल्या काळात बघितलं, मुला-मुलींच्या जन्मदरात काही जिल्ह्यांमध्ये एवढी तफावत बघायला मिळाली की, 1000 मुले जन्माला आले की त्यावेळेस 800 ते 850 मुली जन्माला येत होत्या. पण हा दर 790 पर्यंत गेला. मी म्हटलं, पुढे तर अवघडच होणार आहे. पुढे काही द्रौपदीचा विचार करावा लागेल की काय? असा प्रसंग त्यावेळेस येईल”, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात हास्यकल्लोळ बघायला मिळाला. पण त्यानंतर लगेच अजित पवारांनी आपली चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. “याच्यातला गंमतीतला भाग जाऊद्या, नाहीतर अजित पवारांनी द्रौपदीचा अपमान केला, असं म्हणतील. मला कुणाचाही अपमान करायचा नाही”, असं अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं. अजित पवारांनी यावेळी हातही जोडले.
राज्यात स्त्री-पुरुष यांच्या जन्मदराचं गुणोत्तर योग्य असणं गरजेचं आहे. हे गुणोत्तर योग्य असलं तर ते समाजासाठी आणि देशासाठी देखील चांगलं राहील. यासाठी जनतेचं समुपदेशन करणं जास्त आवश्यक आहे. मुलगा आणि मुलगी यांच्यात कोणताही भेद नाही. मुलगा आणि मुलगी या दोघांना जगण्याचा, शिक्षणाचा सारखा अधिकार आहे, ही बाब नागरिकांच्या मनात बिंबवणं आवश्यक आहे. सरकारकडून तसे प्रयत्नही केले जातात. ज्या घरात मुलीचा जन्म होतो तिथे लाडली सारखी योजना राबवलीदेखील जाते. पण एका दिग्गज नेत्याने द्रौपदीचा उल्लेख करुन खुलेआमपणे आपल्या भाषणात काहीतरी विनोद करणं? हे कितपत योग्य आहे. खरंतर हे स्त्री जातीला हिणवण्यासारखंच नाही का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.
अजित पवार दौंडचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांच्या भेटीला
दरम्यान, अजित पवार दौंडचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांच्या भेटीला गेले आहेत. विशेष म्हणजे खासदार सुप्रिया सुळे आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनीसुद्धा कटारिया यांची भेट घेतली होती. प्रेमसुख कटारिया हे भाजपचे आमदार राहुल कुल यांचे निकटवर्तीय आहेत.