Chhagan Bhujbal : शरद पवार यांच्या घरात छगन भुजबळ वेटिंगवर, काय घडतंय सिल्व्हर ओकमध्ये?
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. गेल्या तासाभरापासून ते शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी असून शरद पवार यांनी अद्याप त्यांच्या भेट घेतलेली नाही. मात्र भुजबळांच्या या कृतीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर अजित पवार हे महायुतीसोबत गेले. गेल्या वर्षी घडलेल्या या घटनेमुळे महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला होता. त्यावेळी प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्यासारखे अनेक महत्वाचे नेते अजित पवार यांच्यासोबत गेले होते. मात्र आता वर्षभरानंतर आता महाराष्ट्रात पुन्हा राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. गेल्या तासाभरापासून ते शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी असून शरद पवार यांनी अद्याप त्यांच्या भेट घेतलेली नाही. मात्र भुजबळांच्या या कृतीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून सगळ्यांचेच या भेटीकडे लक्ष लागले आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून भुजबळ-पवार यांच्या या भेटीमुळे राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळीच भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी त्याच्या निवासस्थानाच्या दिशेने निघाले. मात्र शरद पवार यांची वेळ न घेताच छगन भुजबळ त्यांना भेटायला पोहचले. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर आज केवळ मिलिंद नार्वेकर यांना पवारांच्या भेटीसाठी वेळ देण्यात आली होती. मात्र सकाळी भुजबळ अचानक सिल्व्हर ओक मध्ये आल्याने राजकीय वर्तुळात याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. पण अद्यापही शरद पवार यांनी भुजबळ यांची भेट घेतली नसून तासाभरापासून भुजबळ हे वेटिंगवरच आहेत.
छगन भुजबळ हे वेळ न घेता पवार यांच्या भेटीला आले आहेत. तर ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर हे वेळ घेऊन पवार यांच्या भेटीला आले होते. त्यामुळे पवार यांनी नार्वेकर यांना आधी भेट दिली. त्यामुळे भुजबळ यांना तिष्ठत राहावं लागल्याचं सांगितलं जात आहे. भुजबळ यांना पहिल्यांदाच पवारांची भेट घेण्यासाठी ताटकळत राहावं लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
काही दिवसांपूर्वी भुजबळ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाणार आहेत, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र आज भुजबळांनी थेट पवारांचे निवाससथान गाठल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. भुजबळ अचानक पवारांच्या भेटीसाठी का आले याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे, मात्र त्यामुळे अनेकांची उत्सुकता वाढली असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या भेटीकडे लागले आहे.
काल आरोप , आज पवारांच्या भेटीसाछी दाखल
कालच छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला होता. मात्र त्यानंतर आज सकाळी भुजबळ अचानक सिल्वहर ओकवर पवारांच्या भेटीसाठी पोहोचले. ‘ राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. महाविकास आघाडीने या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. शरद पवार यांनी बारामती येथून फोन केल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला’, असा दावा छगन भुजबळ यांनी केला होता.