रोहित पाटलांच्या ‘बघून घेतो’च्या भाषेवर अजित पवारांचं पहिल्यांदाच उत्तर; सांगलीत वाद चिघळणार?
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथील नगरपंचायत निवडणुकीतून राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील हे निवडणुकीसाठी उभे आहेत. त्यांच्या विरोधात एक राष्ट्रवादीचा गट सक्रीय असल्याचे बोलले जात आहे. त्यावर अजित पवार यांची प्रतिक्रिया
मुंबईः आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील (Rohit Patil) सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. मात्र त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक गट सक्रीय झाला असून या 25 वर्षीय नेत्याला हरवण्यासाठी सर्व विरोधक एकवटले आहेत, असं वक्तव्य एका नेत्याने केलं. याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्या-त्या जिल्ह्याचं राजकारण पाहून निर्णय घ्यावा लागतो.’ अजित पवार यांच्या अशा वक्तव्यामुळे सांगलीतील वाद चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत.
काय म्हणाले अजित पवार?
रोहित पाटील यांच्याविरोधात चाललेल्या राजकारणाविषयी विचारले असता अजित पवार म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्या त्या जिल्ह्याचं राजकारण पाहून निर्णय घ्यायचा आहे. प्रांत अध्यक्ष हे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मीही रोहितला फोन करून विचारेन. रोहित गेल्याच आठवड्यात मला भेटला होता. पण असं कोण कुणाला एकटं पाडेल असं वाटत नाही. रोहितची कामाची पद्धत चांगली आहे. मी त्या संदर्भात माहिती घेऊन त्याला काय मदत पाहिजे ती देण्याचं काम करेन.’
कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर आर पाटील विरोधात महाविकास आघाडी असं चित्र आहे. कवठेमहांकाळमधील राष्ट्रवादीकडील सगळे गट महाविकास आघाडीकडे गेले आहेत. खासदार संजय काका पाटील (भाजप), घोरपडे (शिवसेना), सगरे गट (राष्ट्रवादी) आणि गजानन कोठावळे गट असे सर्व जण एकत्र येऊन महाविकास आघाडी निर्माण केली आहे.
‘माझं वय 23 , दोन वर्षात काही शिल्लक ठेवत नाही’
कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादीची प्रचार सभा होती. यावेळी रोहितच्या भाषणाआधी पक्षातील ज्येष्ठ नेते म्हणाले, की 25 वर्षांच्या तरुणा विरोधात सगळे एकत्र आले आहेत. यावर रोहितने उत्तर दिले की “राष्ट्रवादी पक्ष आणि आबांचं कुटुंबीय हे या तालुक्यात सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेले घटक आहेत. सगळे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे निष्ठावान कार्यकर्ते अशी परिस्थिती आहे. येणाऱ्या काळात असा भीमटोला देण्याची आवश्यकता आहे. माने सर, आपण सांगितलं की 25 वर्षांच्या तरुणाला हरवायला सगळे जण एकत्र आले आहेत. माझं वय 23 आहे. 25 होईपर्यंत काही शिल्लक ठेवत नाही”
रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ नगरपंचायत स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी विरुद्ध महाविकास आघाडी असे पॅनल लागले आहे. कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या 13 जागांसाठी ही निवडणूक लागली आहे. येत्या 23 तारखेला मतदान पार पडणार आहे.
इतर बातम्या-