Ajit Pawar On St: एकिकडे गुलाल उधळतात अन् दुसरीकडे, अजित पवारांचं आझाद मैदानातल्या सेलिब्रेशनवर बोट
जोपर्यंत पोलिसांचा अहवाल येत नाही, तोपर्यंत माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी एकदम कुणाचं नाव घेणं योग्य नाही, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं.
पुणे | शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज संतापजनक प्रतिक्रिया नोंदवली. या आंदोलनाचा मास्टरमाइंड कोण आहे, हे लवकरच पोलीस शोधून काढतील. त्यानंतरच सूत्रधारांची नावं जाहीरपणे सांगता येतील. पण राज्य सरकारतर्फे आंदोलकांचे (ST Strike) समाधान करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु असताना आंदोलनात शिरून प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्यांना उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं आहे. एकिकडे गुलाल उधळता, कौतुकही करून घेता आणि नंतर मात्र इथपर्यंत टोकाचं वागण्याचा प्रयत्न करता, हे योग्य नाही. पोलीस यंत्रणा या सगळ्याचा अहवाल लवकरच सादर करेल, त्यानंतर कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. आझाद मैदानावरील आंदोलनात सहभागी होऊन अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratn Sadavarte) यांनी प्रक्षोभक भाषणे केल्याचा आरोप केला जात आहे. यासंदर्भातील पोलीस चौकशीदेखील सुरु आहे. त्यानंतर सदावर्ते यांचं प्रत्यक्ष नाव न घेता अजित पवार यांनी त्यांच्यावर टीका केली. शुक्रवारी शरद पवार यांच्या मुंबईतील पेडर रोड येथील सिल्व्हर ओक नावाच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी दुपारी तीन वाजेच्या सुमारास हल्ला केला. आझाद मैदानावर आंदोलन कऱणारे संपकरी अचानक तेथे धडकले आणि त्यांनी घरावर चप्पलफेक, दगडफेक सुरु केली. त्यामुळे काही काळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
काय म्हणाले अजित पवार?
शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा निषेध करत अजित पवार म्हणाले, ‘ महाराष्ट्रात असले प्रकार कधी घडलेले नाहीत. कोर्टाने दिलेला निर्णय सर्वोच्च असतो. तो मान्य केला जाईल अशी आशा होती. उद्धव ठाकरे सरकारच्या नेतृत्वात सर्वच मंत्र्यांनी हे आंदोलन शमवण्याचा प्रयत्न केला. सातव्या वेतन आयोगापर्यंत जी रक्कम होती, तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पगारासाठी राज्य सरकार हस्तक्षेप करेल, असं आश्वासनही दिलं. आम्ही चर्चेतून मुद्दा सोडवू लागलो. पण चर्चा ही तिथं जाऊन कऱण्याची गरज नव्हती. तुम्ही एकिकडे गुलाल उधळता, कौतुकही करून घेता आणि नंतर मात्र तुम्ही इथपर्यंत टोकाचं वागण्याचा प्रयत्न करता, यामागे कोण कोण आहे, हे निश्चितपणे कळलं पाहिजे. मला जो पोलिसांचा अनुभव आहे, तो बघता पोलीस हे सगळं निश्चितपणे पाहतील. आपल्या सगळ्यांच्या समोर येईल. जोपर्यंत पोलिसांचा अहवाल येत नाही, तोपर्यंत माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी एकदम कुणाचं नाव घेणं योग्य नाही, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं.
आंदोलन चिघळण्यासाठी राज्य सरकार दोषी?
एसटी कर्मचाऱ्यांचं दिवाळीपासून सुरु असलेलं आंदोलन चिघळण्यासाठी राज्य सरकार दोषी आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. यावर प्रतिक्रिया विचारली असता अजित पवार यांनी हे आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले, हे आरोप धादांत खोटे आहेत. शरद पवार साहेबांनी स्वतः यासाठी नेहरू सेंटरला बैठक घेतली होती. अनल परब, मी, सदाभाऊ खोत, उदय सामंत होते. चन्ने होते. आशिष कुमार सिंग होते. फक्त कुणाला ती बैठक कुणाला कळू द्यायची नव्हती. पण काही दिवसांनी आंदोलकांनी संघटनांचंही ऐकणं बंद केलं. त्यांच्याशीही चर्चा केली. अनिल परब यांच्याकडे संघटनांनीही समाधान व्यक्त केलं. पण काहीजणांनी शिरून चिथावणीखोर भाषा वापरली. ही भाषा कुणालाही आवडणार नाही. आपली संस्कृती, परंपरा, शिकवण नाही. ही फॅक्ट उभ्या महाराष्ट्रानं पाहिली आहे. काहीजणांना बोलत असताना निषेध करायचा आणि दुसरीकडे असे प्रकार घडवून आणायचे, यावर पोलीस काय ते कारवाई करतील, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं.
‘पोलीस कमी पडले हे निर्विवाद सत्य’
शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याची माहिती पोलिसांना कशी मिळाली नाही, याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. एवढं मोठं आंदोलन होतंय, याची काहीच माहिती पोलिसांना नव्हती का? नसेल तर पोलीस माहिती घेण्यात कमी पडले, हे निर्विवाद सत्य आहे. आंदोलकांच्या मागे माध्यमांचेही कॅमेरे होते. माध्यमांना याची माहिती होती तर पोलिसांना कशी नव्हती, याची चौकशी करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असे अजित पवार यांनी सांगितले.
इतर बातम्या-