मागासवर्गीय आयोगाचे सदस्य अँटी मराठा, जातीयवादी…बाळासाहेब सराटे यांचा हल्ला
maratha reservation movement leader | मागासवर्गीय आयोगाचे राजीनामा देणारे सदस्य हे जातीयवादी आहेत. अँटी मराठा आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, यासाठी हे राजीनामे देत असल्याचा आरोप मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी केला.
दत्ता कनवटे, छत्रपती संभाजीनगर | 12 डिसेंबर 2023 : मराठा आरक्षणासाठी राज्यात अनेक पातळ्यांवर काम सुरु होते. मागागर्वीय आयोगाने आपले काम सुरु केले होते. परंतु राज्य मागासवर्ग आयोगाच्या तीन सदस्यांनी राजीनामे दिले. त्यानंतर आता अध्यक्ष माजी न्यायामूर्ती आनंद निरगुडे यांनी राजीनामा दिला आहे. या राजीनामा सत्रावर मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी मागासवर्गीय आयोगाचे राजीनामा देणारे सदस्य हे जातीयवादी आहेत. अँटी मराठा असल्याचा आरोप केला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी हे सर्व जण राजीनामे देत आहेत. हे सगळे सदस्य महाविकास आघाडी सरकारच्या काळात नेमलेले आहेत. आता सरकार बदललेल्यामुळे त्यांनी राजीनामे दिल्याचे सराटे यांनी म्हटले.
बालाजी किल्लारीकर यांनी 1 डिसेंबर रोजी राजीनामा दिल्यानंतर 2 डिसेंबर रोजी हाके यांनीही राजीनामा दिला. आयोगाचे सदस्य सोनवणे यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आता आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी राजीनामा दिल्याचे मंगळवारी समोर आले.
क्यूरेटिव्ह पिटीशन हा वेळकाढूपणा
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात क्यूरेटिव्ह पिटीशन दाखल केली आहे. ही क्यूरेटिव्ह पिटीशन म्हणजे वेळकाढूपणा आहे. क्यूरेटिव्ह पिटीशन हा विषय संपलेला आहे. मराठा समाजाच्या 90 टक्के नोंदी सापडल्या आहे. समाजाला आरक्षण मिळत आहे. क्यूरेटिव्ह पिटीशन म्हणजे निव्वळ वेळ वाया घालवण्याचा प्रकार आहे, असे बाळासाहेब सराटे यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे हे बाळासाहेब ठाकरे मॉडेल
मनोज जरांगे यांची तब्येत खालावली आहे. सरकारने त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. मनोज जरांगे हे काही अण्णा हजारे आणि हार्दिक पटेल मॉडेल नाही तर हे बाळासाहेब ठाकरे मॉडेल आहे. त्यामुळे समाजाला न्याय मिळण्यासाठी राजकारण हाच अंतिम पर्याय असेल तर आम्हाला तोही पर्याय निवडावा लागेल. छगन भुजबळ हा निर्बुद्ध माणूस आहे. काहीही बोलत असतो, त्याला फक्त राजकारण दिसत आहे. पण भुजबळ यांना राजकारण करायचं असेल तर आम्ही पण राजकीय पर्याय निवडू शकतो.