उद्धव ठाकरे, शरद पवारांकडून भाजपच्या कौतुकानंतर अमित शाह यांचा दोन्ही नेत्यांवर जबरदस्त प्रहार, शिर्डीतील अधिवेशनातून शाह यांनी काय दिला संदेश?
Amit Shah criticizes Sharad Pawar Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनाही २०१९ मध्ये आमच्यासोबत द्रोह केला. त्यांनी विचारधारा सोडली. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले. त्या उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्याचे काम तुम्ही केले. विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवली.
भारतीय जनता पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशनाचा समारोप रविवारी शिर्डीत झाला. या समारोप समारंभास भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आले होते. सध्या शिवसेना उबाठा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून भाजपसंदर्भात चांगली वक्तव्य केली जात आहे. त्यामुळे अनेक राजकीय पंडितांना आश्चर्य वाटत आहे. परंतु रविवारी अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना घेरले. त्यांच्यावर घणाघाती टीका केली. महाराष्ट्रातील जनतेच्या विश्वासघात केल्याची टीका अमित शाह यांनी केली.
काय म्हणाले अमित शाह?
अमित शाह यांनी सांगितले की, १९७८ मध्ये शरद पवार यांनी बंडखोरी केली होती. त्यांनी त्यावेळी विश्वासघात करण्याचे जे राजकारण केले होते, त्यावेळी त्यांना धडा शिकवण्याचा काम महाराष्ट्रातील जनतेने केले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनाही २०१९ मध्ये आमच्यासोबत द्रोह केला. त्यांनी विचारधारा सोडली. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले. त्या उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्याचे काम तुम्ही केले. विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवली. १९७८ ते २०२४ पर्यंत महाराष्ट्र जेव्हा जेव्हा अस्थिर करण्याचा प्रयत्न केला. त्या, त्या वेळी स्थिर सरकार देण्याचे काम तुम्ही केले. हिंदुत्व आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या राजकारणास विरोध करणाऱ्यांना तुम्ही धडा शिकवला. विधानसभा निवडणुकी खरी शिवसेना खऱ्या राष्ट्रवादीला तुम्ही विजय केले. घराणेशाही राजकारण करणाऱ्यांना नाकारले.
शरद पवार यांच्यावर टीका करताना अमित शाह म्हणाले, काही दिवसांपूर्वी मी एक चित्र पाहत होते. त्या चित्रात शरद पवार महाराष्ट्रातील विविध विभागाकडे पाहत होते. त्या चित्राचा अर्थ मी शरद पवार यांना समजवतो. महायुतीला उत्तर महाराष्ट्रात २२ पैकी २१ जागा विधानसभेत मिळाल्या. कोकणात १७ मधून १६ जागा मिळाल्या. पश्चिम महाराष्ट्रात २६ मधून २४ जागा मिळाल्या. पश्चिम विदर्भात १७ पैकी १६ जागा मिळाल्या. पूर्व विदर्भात २९ पैकी २२ तर मरावाड्यात २० पैकी १९ जागा मिळाल्या. मुंबईत १७ पैकी १५ जागांवर विजय मिळला.
शरद पवार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकले नाही…
शरद पवार मुख्यमंत्री राहिले, देशाचे कृषीमंत्री राहिले. परंतु राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवू शकले नाही. आता भाजप सरकार प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचवल्याशिवाय थांबणार नाही, असे अमित शाह यांनी म्हटले. ते पुढे म्हणाले, लोकसभेनंतर महाराष्ट्रात महायुतीचा पराभव होणार? अशी स्वप्न पाहिली जात होती. त्यांचे स्वप्न तुम्ही धुळीस मिळवली. महाराष्ट्राचा महाविजयाने देशातील राजकारणावर पटरीवर आणले गेले. या महाविजयाचे श्रेय भाजप कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातील जनतेला आहे, असे अमित शाह यांनी म्हटले.