Amaravati Rada | भाजप प्रवक्ते आणि पदाधिकाऱ्यांना येण्यास पोलिसांनी रोखले, अमरावतीच्या अचलपूरमध्ये तणावपूर्ण शांतता
अमरावतीमधील अचलपूर येथे काल दोन गटात किरकोळ कारणावरून वाद झाले. त्यानंतर दगडफेक झाली. येथे आता तणावपूर्ण शांतता आहे.
अमरावती : अमरावतीत अचलपूर (Achalapur, Amravati) येथे दोन गटात झालेल्या राड्यानंतर भाजप (BJP Leaders) पदाधिकाऱ्यांना शहरात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. प्रवक्ते शिवराय कुलकर्णी,भाजप जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांना अचलपूर शहरात येण्यास पोलिसांची (Police) बंदी घालण्यात आली आहे. शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. काल अचलपूरमध्ये झंडा लावण्यावरून दोन गटात हाणामारी झाली होती. या वादातून दोन गटात दगडफेकही झाली. मात्र पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्यानंतर जमाव पांगला. अचलपूरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे. मात्र वातावरण आणखी बिघडू नये, यासाठी पोलिसांनी भाजप पदाधिकाऱ्यांना अचलपूरमध्ये येण्यापासून रोखल्याची माहिती हाती आली आहे.
भाजप पदाधिकाऱ्यांना रोखले
अचलपूरमध्ये सध्या तणावाचे वातावरण असून राजकीय व्यक्तींच्या काही वक्तव्यांमुळे हे वातावरण आणखी बिघडण्याची शक्यता पाहता, पोलिसांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना अचलपूरमध्ये येण्यापासून रोखले आहे. भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, भाजप जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांना अचलपूरमध्ये येण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. भाजप पदाधिकाऱ्यांचा ताफा बाहेरच रोखण्यात आला असून तो सध्या चांदूर बाजार नाका परिसरात असल्याची माहिती हाती आली आहे.
काय घडलं अचलपूरमध्ये ?
अचलपूर येथील दुल्हा गेट परिसरात काल दोन गटात वाद झाले. झेंडा काढल्याच्या कारणावरून या वादावादीला सुरुवात झाली. दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर दगडफेक केली. ऐनवेळी पोलिसांच्या मध्यस्थीनंतर जमावाची पांगवापांगव करण्यात आली. रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. वातावरण निवळल्यानंतरही पोलिसांकडून खबरदारीचे उपाय योजले जात आहेत. सध्या अचलपूर आणि परतवाड्यात संचारबंदी लागू असून तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
इतर बातम्या-