आमदारांना घोडा म्हणणं, हा गाढवपणा! संजय राऊतांच्या यू टर्नवर भाजप खासदार अनिल बोंडेंचा वार!
महाविकास आघाडी सरकारला प्रत्येक जण वैतागलेला आहे. मुख्यमंत्री तुम्हाला मदत करणार नसेल, भेटणार नसेल तर आमदारांचीही मोठी कुचंबणा होते,'अशी प्रतिक्रिया अनिल बोंडे यांनी व्यक्त केली.
अमरावती : आमदारांना घोडा म्हणणं हा शुद्ध गाढवपणा आहे. ही चूक ज्यांनी केली, त्यांच्या ती लक्षात आली आहे. त्यामुळेच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) प्रकरणी यु टूर्न घेतल्याचं वक्तव्य भाजप खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केलं आहे. अपक्ष आमदार देवेंद्र भुयारांची मुख्यमंत्र्यांबाबतची तक्रार योग्य असून त्यावर उपाययोजना लवकरच करू असं आश्वासन संजय राऊतांनी दिलंय. राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आमदारांनी दगाबाजी केल्याचा आरोप करताना आधी हे आमदार घोडे बाजारात विकले गेल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला होता. मात्र भुयारांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर, तसंच त्यांनी शरद पवार आणि संजय राऊतांची भेट घेतल्यानंतर राऊतांनी या प्रकरणी आपलं वक्तव्य मागे घेतलं. भुयारांचं बोलणं प्रामाणिकपणातून आलंय, असं वक्तव्य राऊतांनी केलं.
अनिल बोंडे काय म्हणाले?
देवेंद्र भुयार प्रकरणी संजय राऊतांची यू टर्न घेतल्यावर प्रतिक्रिया देताना अनिल बोंडे म्हणाले, ‘अपक्ष आमदार तीन लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो. त्याला घोडा म्हणणं हा गाढवपणा आहे. संजय राऊतांना हे कळून चुकलंय. त्यामुळे त्यांनी युटर्न घेतला असेल. कारण प्रत्येक आमदाराला विचारणारे लोक मतदार संघात असतात. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मला निधी मिळत होता. कामं होत होती. रुग्णांना मदत केली. शेतकऱ्यांना मदत दिली. पण महाविकास आघाडी सरकारला प्रत्येक जण वैतागलेला आहे. मुख्यमंत्री तुम्हाला मदत करणार नसेल, भेटणार नसेल तर आमदारांचीही मोठी कुचंबणा होते,’अशी प्रतिक्रिया अनिल बोंडे यांनी व्यक्त केली.
संजय राऊतांचा यू टर्न!
राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊतांनी दगाबाजांविरोधात आरेरावीची भाषा वापरली. या निवडणुकीत ज्यांनी दगा दिला, त्यांना बघून घेतलं जाईल, असं ते म्हणाले. तसेच ज्यांनी दगा दिलाय, त्यांचीही नावं घेतली. जे घोडे बाजारात विक्रीसाठी होते, ते विकले गेले, असं वक्तव्य केलं. यात मोर्शीचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांचंही नाव होतं. मात्र भुयार यांनी हे आरोप फेटाळून लावले. मुख्यमंत्री आम्हाला मदत करत नाही. त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटताही येत नाही. असे असले तरीही मी महाविकास आघाडीसाठीच मतदान केलंय. पण राऊतांनी अशा शब्दात आरोप करणं चुकीचं आहे. अशी खंत भुयारांनी व्यक्त केली होती. यानंतर त्यांनी शरद पवार आणि संजय राऊतांची भेट घेतली. या भेटीत देवेंद्र भुयार यांच्या भावना प्रामाणिक असल्याचं जाणवल्याचं संजय राऊतांनी सांगितलं. तसंच यासंबंधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असं आश्वासनही दिलं.