Amravati : शेत रस्ता अडविल्यामुळे शेतकऱ्याची आत्महत्या, चिठ्ठीमुळे उलगडला घटनाक्रम
अंजनगाव सुर्जी येथील शिवारात पांडुरंग काशीनाथ महल्ले यांना वडिलोपार्जित शेत जमिन आहे. मात्र, शेताकडे जाण्यासाठी वहिवाट असलेलाच रस्ता आहे. शिवाय याच रस्त्याचा वापर आतापर्यंत केला जात होता. पण गेल्या वर्षभरापासून रामराव शामराव वानखडे यांनी त्यांची वाट अडविल्याचे समजते. त्यामुळे शेती कामेही करणे मुश्किल झाले होते.
अमरावती : (Farm Road) शेत रस्त्यावरुन वाद हे काही नवीन नाही. पण हेच वाद किती टोकाला जाऊ शकतात याचा प्रत्यय (Amravati) अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे आला आहे. शेतामध्ये जाण्यासाठी असलेला वहिवाटेचा रस्ताच शेजाऱ्यांनी अडविल्याने पांडूरंग काशीनाथ महल्ले यांनी गळफास घेऊन (Suicide) आत्महत्या केली. शेतात जाताना सातत्याने त्यांची अडवणूक केली जात होती. आता खरीप हंगामाची कामे तोंडावर असतानाही त्यांना स्वत:च्या शेतामध्ये जाता येत नव्हते. त्यामुळे शेत पडीक पडण्याची वेळ आल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्या करण्यापूर्वी महल्ले यांनी चिठ्ठीमध्ये नेमके कोणत्या कारणामुळे टोकाचे पाऊल उचलत आहे? हे लिहून ठेवले होते. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
वर्षभरापासून शेतकऱ्याची अडवणूक
अंजनगाव सुर्जी येथील शिवारात पांडुरंग काशीनाथ महल्ले यांना वडिलोपार्जित शेत जमिन आहे. मात्र, शेताकडे जाण्यासाठी वहिवाट असलेलाच रस्ता आहे. शिवाय याच रस्त्याचा वापर आतापर्यंत केला जात होता. पण गेल्या वर्षभरापासून रामराव शामराव वानखडे यांनी त्यांची वाट अडविल्याचे समजते. त्यामुळे शेती कामेही करणे मुश्किल झाले होते. आता खरीप हंगाम तोंडावर आहे. त्यामुळे मशागतीची कामे पूर्ण करण्यासाठी महल्ले हे ट्रॅक्टर घेऊन मार्गस्थ झाले असता त्यांची अडवणूक करण्यात आली. सर्वकाही असूनही शेतीच करता येत नसल्याने त्रस्त पांडूरंग महल्ले यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
चिठ्ठीमध्ये नेमके काय?
मृतकाने मृत्यूपुर्व चिठ्ठी लिहून ठेवली होती,त्यात देविदास तुळशीराम वानखडे, रामराव शामराव वानखडे आणि त्याचा मुलगा माझे आत्महत्येस दोषी असल्याचे चिठ्ठीत नमूद केले होते. त्यामुळे आत्महत्या मागचे नेमके कारण काय हे समोर आले. पोलिसांनी यापैकी तिघांना अटक केली आहे. शुल्लक कारणावरुन शेतकऱ्यास हे टोकाचे पाऊल उचलावे लागले होते.
ग्रामीण रुग्णालयात काही काळ तणाव
पांडुरंग काशीनाथ महल्ले यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीमुळे सर्वकाही स्पष्ट झाले होते. त्यामुळे संबंधितांना अटक केल्यावरच मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची मागणी नातेवाईकांनी केली. अन्यथा मृतदेह हा रुग्णालयातच ठेवला जाण्याचा इशारा मृत शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी दिला होता. ठाणेदार दिपक वानखडे यांनी नातेवाईकांची समजूत काढत वेगाने आरोपीस शोधण्यास तातडीने दोन पथके रवाना केली. रात्री दहा वाजता आरोपी देविदास तुळशीराम वानखडे , रामराव शामराव वानखडे, सुरज रा.वानखडे यास अटक केली. आरोपींची 15 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.