Marathi woman | मराठी तरुणीचा अमेरिकेत उद्योग क्षेत्रात डंका; नगरच्या माधुरी झिंजुर्डेची हॉटेलिंग व्यवसायात दमदार एंट्री
शालेय जीवनापासून माधुरीचे स्वप्न परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचे होते. त्यासाठी आई-वडिलांचं सहकार्य मिळाले. माधुरीने कष्ट, चिकाटी, जिद्दीच्या जोरावर सारे मिळविले. दुबई येथे नोकरीनिमित्त दोन-अडीच वर्ष एकटी राहिली. पुन्हा उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला भरारी घेतली.
अमरावती : यंदा छत्रपती फाउंडेशन न्यूयॉर्कतर्फे (Chhatrapati Foundation New York) मराठी समुदायाचे औद्योगिकरण अतिशय वेगाने सुरू आहे. परंपरागत शेती व्यवसायाबरोबरच आता मराठी समुदाय जगभरातील सर्वच उद्योग व्यवसायात यशस्वी पदार्पण करतोय. जगभरातील आधुनिक उद्योग संस्कृती आत्मसात करीत आहे. एक आधुनिक उद्योग संस्कृती विकसित करण्यासाठी बहुमोल योगदान मराठी समुदाय जगभरात देण्यासाठी सिद्ध झाला आहे. अमेरिकेत पाच नवीन स्टार हॉटेल (Five New Star Hotels) सुरू करण्याचा निर्णय छत्रपती फाउंडेशन न्यूयॉर्कच्या सर्व सहकारी बांधवांनी घेतला आहे. हा अतिशय क्रांतिकारक निर्णय आहे. या पाच हॉटेलपैकी एक हॉटेल एक मराठी तरुणी माधुरी नामदेव झिंजुर्डे (Madhuri Namdev Zinjurde ) या नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील मुलीने विकत घेतले आहे. ही अतिशय अभिमानाची बाब आहे. मराठी तरुणी ही युवकांच्या सोबत सर्व व्यवसायात जबाबदारी स्वीकारून पुढे येत आहेत.
दुबईत नोकरी, अमेरिकेत व्यवसाय
माधुरी मूळची नेवासा येथील. पण, नोकरी व्यवसायानिमित्ताने आई-वडील पुण्यात आले. वडील नोकरी करीत असताना आई शिवन क्लास चालवित असे. माधुरीचे शालेय शिक्षण पुणे जिल्ह्यातील दापोडी तालुक्यातील सांगवी येथे मराठी माध्यमाच्या शाळेत झाले. अकरावी, बारावी हुजुर पागा पुणे येथे झाले. शालेय जीवनापासून माधुरीचे स्वप्न परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचे होते. त्यासाठी आई-वडिलांचं सहकार्य मिळाले. माधुरीने कष्ट, चिकाटी, जिद्दीच्या जोरावर सारे मिळविले. दुबई येथे नोकरीनिमित्त दोन-अडीच वर्ष एकटी राहिली. पुन्हा उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला भरारी घेतली. माधुरीचं लग्न नगर जिल्ह्यातील महेंद्र सिनारे यांच्याशी झालं. महेंद्र सिनारे यांनी यापूर्वी दोन हॉटेल अमेरिकेत विकत घेतले. त्यात माधुरीचेही योगदान आहे. आता माधुरीने स्वतंत्र नवीन हॉटेल विकत घेतले. त्याचं उद्घाटन नुकतंच करण्यात आलं.
स्वप्निलचा अमेरिकेत तोरणा उद्योग समूह
स्वप्निल खेडेकर यांनी नव्याने सर्व मराठी तरुणांना उद्योग व्यवसायात उभे करण्याचे ठरविले. त्यासाठी तोरणा उद्योग समूह अमेरिका या नव्या उद्योग व्यवसायासाठी कार्य करणाऱ्या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वप्निल खेडेकर आहेत. महेंद्र सिनारे उपाध्यक्ष आहेत. या गृपच्या माध्यमातून हॉटेल, मोटेल, आयटी, आयात-निर्यात यासह वेगवेगळ्या क्षेत्रात उद्योगाची साखळी निर्माण करण्याचा उद्देश आहे. या माध्यमातून मराठी तरुणांना उद्योगासाठी नवीन आकाशच मोकळं झालं आहे.