‘…तर त्यांना लगेच पक्षप्रवेश द्या, आमच्या शुभेच्छा’, बच्चू कडूंच्या इशाऱ्यावर अब्दुल सत्तारांची भूमिका
"कुणी कुणाच्या संपर्कात असतील तर त्यांनी पक्षप्रवेश द्यावा", असं विधान अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.
अमरावती : प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) आणि भाजपचे समर्थक आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केला होता. बच्चू कडूंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला पाठिंबा देण्यासाठी खोके (पैसे) घेतल्याचा आरोप केला होता. त्यांच्या याच आरोपांवरुन बच्चू कडू चांगलेच संतापले आहेत. त्यांनी काल (26 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेत रवी राणा यांना 1 नोव्हेंबरपर्यंत खोके घेतल्याच्या आरोपांप्रकरणी पुरावे सादर करण्यास सांगितलं आहे. तसेच राणा यांनी पुरावे सादर न केल्यास आपण सरकारमधून बाहेर पडू, त्यासाठी सात ते आठ आमदार आपल्या संपर्कात असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यावर राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कुणी कुणाच्या संपर्कात असतील तर त्यांनी पक्षप्रवेश द्यावा”, असं विधान अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेवर आता बच्चू कडू काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
“आता कुणाच्या संपर्कात कोण आहे, कुणी संपर्कात असेल तर त्यांना लगेच पक्षप्रवेश द्या. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत”, अशी भूमिका अब्दुल सत्तार यांनी मांडली आहे. त्यांची ही प्रतिक्रिया कदाचित बच्चू कडू यांना अपेक्षित नसेल. त्यामुळे सत्तार यांच्या या प्रतिक्रियेवर बच्चू कडू काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. “रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात गैरसमज झालेत. फडणवीस आणि शिंदे या दोघांमधील वाट मिटवतील”, असं बावनकुळे म्हणाले आहेत.
“बच्चू कडू आणि रवी राणा हे दोघे नेते आपापल्या मतदारसंघाच प्रभावी नेते आहेत. दोघेही अनेक वर्षांपासून आपापल्या कामांवरुन निवडून येत आहेत. मला जे काही दिसतंय, दोघामध्ये वाद पेटवण्याचं आणि ठिणगी टाकण्याचं काम झालंय. या ठिणगीतून गैरसमज वाढत गेले आणि त्याचा स्फोट झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यामध्ये मध्यस्थी करतली. दोन्ही आमदार सरकारमध्ये सोबत आहेत. त्यामुळे त्यांचा नेमका गैरसमज काय झाला, तो गैरसमज दूर होईल”, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.