“उद्धव ठाकरे यांच्या सभेचा मुस्लिम समाजावर काही परिणाम होणार नाही,”शिवसेनेच्या नेत्यानं नेमकं राजकारण सांगितले…
कसबा पोटनिवड़णुकीतील पराभवाचे कारण शोधले जाईल. तसेच पुढं भविष्यामध्येही असं होणार नाही याबाबत उपाययोजना करणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले आहे.
अमरावतीः उद्धव ठाकरे यांची उद्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे सभा होत आहे. या सभेला मुस्लिमांनी उपस्थित राहावे असे आवाहन मराठी मुस्लीम सेवा संघाचे अध्यक्ष फकीर ठाकूर यांनी केले आहे. यावर अमरावतीत बोलताना कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. कुणी बोलले म्हणून मुस्लिम समाज त्यांच्या पाठीशी राहत नाही. सर्व समाजाला न्याय देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या सभेचा मुस्लिम समाजावर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
मुस्लिम समाज हा एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी असल्याची प्रतिक्रिया कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली आहे. राज्यात एकीकडे औरंगाबादमधेय एमआयएम पक्षाने आंदोलन केले आहे.
तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम समाजाला आवाहन केल्याने विरोधकांनी त्यावरून राजकारण करण्याचे काम सुरु केले आहे.
पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीत मतदारसंघात भाजप व शिंदे गटाचा झालेल्या पराभवावर सुद्धा अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कसबा पोटनिवड़णुकीतील पराभवाचे कारण शोधले जाईल. तसेच पुढं भविष्यामध्येही असं होणार नाही याबाबत उपाययोजना करणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले आहे. 2024 मध्ये राज्यामध्ये पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होतील अशी प्रतिक्रिया सुद्धा अब्दुल सत्तार यांनी दिली.
अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याने आता शिवसेना आणि ठाकरे गटाचा वाद चिघळण्याची शक्यता आहे. त्यातच कोकणाच्या सभेआधीच राजन साळवी यांच्या एसीबी चौकशीवरूनही हे राजकारण तापणार असल्याचे दिसून येत आहे.
शिवसेना आणि ठाकरे गटामधील वेगवेगळ्या मुद्यांवर आता राजकारण तापत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या दोन्ही गटातील वाद उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यातच आता हिंदू-मुस्लिम हा वाद उफाळून वर आल्याने आणि अब्दुल सत्तार यांनी या वादावर भाष्य केल्याने आता ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया व्यक्त केली जाणार याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.