माजी गृहमंत्री म्हणून खात्रीने सांगतो देवेंद्र फडणवीस…; अनिल देशमुख यांचा मोठा दावा
Anil Deshmukh on Devendra Fadnavis : माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अनिल देशमुख यांनी जालन्यातील अंतरवली सराटी गावात झालेल्या लाठीमारावर प्रतिक्रिया दिली आहे. आगामी निवडणुकीवरही त्यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय? वाचा...
स्वप्निल उमप, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, अमरावती | 29 नोव्हेंबर 2023 : जालन्यातील अंतरवली सराटी गावात झालेल्या लाठीमारावर राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अनिल देशमुख यांनी भाष्य केलं आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज झाला. तो लाठीचार्ज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसारच लाठीचार्ज करण्यात आला, असा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे. तसंच आगामी निवडणुकीवरही त्यांनी भाष्य केलं आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत सुरु असलेल्या सुनावणीवरही अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अनिल देशमुख म्हणाले…
माजी गृहमंत्री म्हणून मी खात्रीपूर्वक सांगतो. ज्या बाबी माहिती अधिकारात समोर आल्या आहेत. त्या खोट्या आणि चुकीच्या आहेत. गृहमंत्र्यांनी लाठीचार्जचे आदेश दिले होते. हे त्यांनी स्वतः कबुल केलं पाहिजे. हे सरकार जाणीवपूर्वक मराठा आणि ओबीसींमध्ये भांडणं लावत आहेत, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे.
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाच्यावर सुनावणीवर प्रतिक्रिया
निवडणूक आयोगावर केंद्र सरकारचा दबाव असेल तर चिन्ह बाबत निर्णय हा त्यांच्या बाजूने लागेल आणि निवडणूक आयोगावर जर दबाब नसेल तर निकाल आमच्या बाजूने लागेल. जातिनिहाय जनगणना करण्याची आमची मागणी आहे. पण भाजप सरकार का करत नाहीये?, असा सवाल देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
आगामी निवडणुकीवर म्हणाले…
अमरावती लोकसभा रामटेक लोकसभा संदर्भात तीन पक्षाचे नेते बसून निर्णय घेतील. अमरावती लोकसभा संदर्भात काही इच्छुक उमेदवार शरद पवार यांना भेटले आहेत. प्रत्येक पक्षाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. जो उमेदवार असेल. त्यासाठी तिन्ही पक्षाचे लोक काम करतील, असं अनिल देशमुख म्हणाले आहेत.
“सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही”
महाराष्ट्रासमोर अवकाळी पावसाचा प्रश्न आहे. पावसामुळे कापूस, तूरीचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यातील शेतकऱ्यांवर मोठं संकट आलं आहे. शेतकरी अडचणीत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचारासाठी बाहेर फिरत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला पाहिजेत. मागील नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नाही. हे भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे. भाजप सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. शेतकरी दिंडीत फडणवीस यांनी मागणी केली होती की सोयाबीनला 6 हजार भावाची मागणी केली. पण फडणवीस मुख्यमंत्री असतांना मात्र त्यांनी भाववाढ केली नाही. कापसाला 14 हजार आणि सोयाबीन ला 8 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला पाहिजे, असंही अनिल देशमुख म्हणाले आहेत.