‘ठाकरे सरकारचे कपडे अंडरवर्ल्डमध्ये भिजलेले, आमची हयात विरोधीपक्षात गेली, घाबरत नाही’ आशिष शेलार यांनी दंड थोपटले
फडणवीसांनी केलेल्या आरोपांचा आधार घेत भाजप नेते तथा आमदार आशिष शेलार यांनीदेखील मलिक यांच्यावर निशाणा साधलाय. अंडरवर्ल्डशी असलेले संबंध झाकण्यासाठी मलिक चांडाळचौकडी करत आहेत, असं शेलार यांनी म्हटलंय. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या लोकांकडून जमीन खरेदी केल्याचा गंभीर आरोप केलाय. या आरोपानंतर मलिक यांनी फडणवीसांचा बॉम्ब तर फुटला नाही, पण आम्ही हायड्रोजन बॉम्ब फोडणार असे म्हणत मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा दिला. आता मलिकांचे वक्तव्य तसेच फडणवीसांनी केलेल्या आरोपांचा आधार घेत भाजप नेते तथा आमदार आशिष शेलार यांनीदेखील मलिक यांच्यावर निशाणा साधलाय. अंडरवर्ल्डशी असलेले संबंध झाकण्यासाठी मलिक चांडाळचौकडी करत आहेत. आमची हयात विरोधी पक्षात गेली. घाबरत नाही असं शेलार यांनी म्हटलंय. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
ठाकरे सरकारचे कपडे अंडरवर्ल्डमध्ये भिजलेले
“राज्यातल्या ठाकरे सरकारचे कपडे कसे अंडरवर्ल्डमध्ये भिजलेले आहेत, हे देवेंद्र फडणवीस यांनी उघड केलंय. नवाब मलिक यांना फटाके भिजलेले दिसले. पण त्यांचा चेहरा घामाने भिजलेला असल्याचं दिसलं. सरदार शहावली खान हा 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आहे. त्याच्याशी मलिक यांचे आर्थिक व्यवहार आहेत,” असे शेलार म्हणाले.
नवाब मलिक सामान्य जनतेला मूर्ख समजतात का ?
तसेच “मोहम्मद सलीम याच्याशीदेखील मलिक यांचे आर्थिक व्यवहार आहेत. मलिक यांनी कवडीमोलाने जमिनीची मालकी मिळवली. नवाब मलिक यांनी सरदार शहावली खानशी संबंधित आरोप कबुल करतात. दीडपट कमी किमतीत जागा मिळवली, हे नवाब मलिक यांनी कबूल केलंय. नवाब मलिक कबूल करत कबुली जबाब देत आहेत. वॉचमन कुठलाही व्यवहार न करता जागेवर नाव नोंदणी कशी करू शकतो. संपूर्ण इमारत कमी किमतीत भाड्याने मिळते. नवाब मलिक सामान्य जनतेला मूर्ख समजतात का. सरकारच्या रेडिरेकनर दराच्या खाली जागा कशी मिळाली ? असा सवाल शेलार यांनी केला.
आमची हयात विरोधीपक्षात गेली, आम्ही घाबरत नाही
तसेच पुढे बोलताना “नवाब मलिक यांना बोलू द्या, त्यांचेच दात त्यांच्या घशात पडतील. आमची हयात विरोधीपक्षात गेली आहे. त्यामुळे आम्ही घाबरत नाही,” असे म्हणत शेलार यांनी मलिक यांनी हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याच्या वक्तव्यावर पलटवार केला.
नवाब मलिक काय म्हणाले होते ?
‘फडणवीसांविरोधात उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडणार’
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मी उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडणार. फडणवीसांचे लोक कोणत्या अधिकाऱ्याकडून जमिनी हडप करण्याचं काम करत होते. कशाप्रकारे एक अंडरवर्ल्डचा म्होरक्या विदेशात बसून या शहरातून वसुली करत होता? तो म्होरक्या कुणासाठी काम करत होता? तो अधिकारी कुणाचा खास होता? याची उत्तरं जाणून घेण्यासाठी उद्या सकाळी 10 वाजेची वाट पाहा, असं मलिक म्हणाले होते.
इतर बातम्या :
कथित वसुली प्रकरणात नंदकुमार गोपाले आणि आशा कोरके यांना 7 दिवसांची सीआयडी कोठडी