आला रे आला बिबट्या आला! मादी आणि दोन बछड्यांचा मुक्तसंचार, गावकरी बॅटरीसह जेसीबी घेऊन गेले पण…
अनेक शेतकऱ्यांनी बिबट्या असल्याचे लक्षात आल्याने मळे वस्तीची वाट धरली, हातात बॅटरी आणि काठी घेऊन अनेक नागरिकांनी बिबट मादी आणि बछडे पाहण्यासाठी गर्दी केली होती.
नाशिक : खरं म्हणजे नाशिक शहराची लेपर्ड सिटी म्हणून ओळख होऊ लागली आहे. नाशिक शहरासह ग्रामीण भागात दररोज कुठे ना कुठे मुक्तसंचार पाहायला मिळत आहे. त्यामुळे नाशिक शहरात बिबट्याच्या ( Nashik Leopard ) संदर्भात कुठली ना कुठली घटना समोर येत आहे. नुकतीच नाशिकच्या सिन्नर ( Sinnar News ) परिसरात बिबट मादी आणि आणि तिचे दोन बछडे यांचा मुक्तसंचार नागरिकांच्या निदर्शनास आला आहे. रात्रीच्या वेळी मळे वस्तीत बिबट मादी आणि बछडे दिसल्याने नागरिकांनी बॅटरी घेऊन पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. याच दरम्यान नागरिकांनी थेट जेसीबीच आणल्याने संपूर्ण जिल्हाभर चर्चा होऊ लागली आहे.
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सायाळे शिवारात बिबट मादीसह तिचे दोन बछडे यांचा मुक्त संचार दिसून आला होता. बुधवारी सायंकाळच्या वेळेला एका वस्तीवर दिसलेले हे दृश्य काही क्षणात गावभर झाले.
अनेक शेतकऱ्यांनी बिबट्या असल्याचे लक्षात आल्याने मळे वस्तीची वाट धरली, हातात बॅटरी आणि काठी घेऊन अनेक नागरिकांनी बिबट मादी आणि बछडे पाहण्यासाठी गर्दी केली होती. त्यावेळी बिबट मादी आणि बछडे हे तिन्ही एका घरात गेले.
या घरात कोणीही राहत नव्हते, त्यामुळे बिबट्या आणि बछडे यांना घरातच कोंडून घेण्यासाठी नागरिकांनी शक्कल लढवली. तातडीने जेसीबी बोलावण्यात आले. त्यामध्ये दरवाजाला बंद करून घेण्यासाठी जेसीबीचा वापर करण्याची तयारी केली गेली.
गावकऱ्यांनी जेसीबी बोलावला, ज्या घरात बिबट मादी आणि बछडे शिरले होते, तिथेच जेसीबी लावण्यात आला. पण तोपर्यंत बिबट्याने आणि बछडयांनी धूम ठोकली. त्यामुळे मोठा प्रयत्न नागरिकांचा फसला.
तोपर्यंत गावकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले होते. बिबट मादीचे ठसे यावरून परिसरात पिंजरा लावण्यात आला आहे. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सायाळे रस्त्यावर श्यामलाल जाजू यांची ती वस्ती आहे. जाजू हे तिथे वास्तव्यास नसून ते वावी येथे राहतात. त्यांचेच बंद अवस्थेत असलेल्या घरात बिबट मादी आणि बछडे शिरले होते. त्यात खोलीत बंद करण्याचा प्रयत्न फसल्याने अधिक चर्चा होऊ लागली आहे.
खरंतर याच वेळी जेसीबीच्या पंजाच्या सहाय्याने दरवाजा बंद ही करण्यात आला होता. पण नागरिकांच्या आवाजाने आधीच बिबट मादीने आणि बछडे यांनी पलायन केल्याचे समोर आले आहे. या परिसरात चार पाच दिवसांपासून बिबट्याचा मुक्तसंचार नागरिकांना दिसून येत आहे.