पंढरपुरात ठरलं, पृथ्वीबाबांना कराडमध्ये पाडायचं, अतुल भोसलेंना निवडायचं!
पंढरपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने 85 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या अद्ययावत भक्तनिवासाचे उद्घाटन झालं. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, सहकार मंत्री सुभाष देशमुख उपस्थित होते. याशिवाय राष्ट्रवादीचे माढा मतदारसंघाचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावून सर्वांचं लक्ष वेधून […]
पंढरपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने 85 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या अद्ययावत भक्तनिवासाचे उद्घाटन झालं. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, सहकार मंत्री सुभाष देशमुख उपस्थित होते. याशिवाय राष्ट्रवादीचे माढा मतदारसंघाचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
या कार्यक्रमासाठी मंदिर समितीचे अध्यक्षअतुल भोसले हे कराडवरुन 3 हजार वारकऱ्यांना घेऊन उपस्थित होते. हे सर्व लोक कराड विधानसभा मतदारसंघातील आहेत. या लोकांना हा कार्यक्रम कसला आहे हे माहीत नाही. इतकंच नाही तर सर्व वारकरी वाटावेत म्हणूण चक्क या लोकांना पांढऱ्या टोप्या वाटण्यात आल्या. यामध्ये बहुतेक जण शेतकरी आहेत.
याकार्यक्रमादरम्यान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचं भाषण झालं. चंद्रकांत पाटील म्हणाले, “डॉ. अतुल भोसले यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी दिलेलं योगदान पाहता, मुख्यमंत्री राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या विकासाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवतील. त्यांनी सध्याची जबाबदारी सार्थ ठरवली आहेच, पण अतुल भोसले यांना कराड दक्षिणमधून निवडणूक लढवायची आहे, ते निश्चितच आमदार होतील. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव त्यांना करायचा आहे”.
“2019 च्या विधानसभा निवडणुकीत कराडमधून अतुल भोसले आमदार होतील. कराडमधून तुम्हाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाडायचं आहे.” , असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
कोण आहेत अतुल भोसले?
कोण आहेत अतुल भोसले?
-अतुल भोसले सध्या पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष आहेत
-मूळचे कराडचे असलेल्या अतुल भोसलेंना मानणारा मोठा वर्ग कराडमध्ये आहे.
-अतुल भोसले यांनी 2014 मध्ये भाजपकडून कराड दक्षिण मतदारसंघातून, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती.
-या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण, विलासकाका पाटील उंडाळकर आणि अतुल भोसले अशी तिहेरी लढत होती.
-या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांनी विजय मिळवला होता, मात्र विलासकाक आणि अतुल भोसलेंनी त्यांची चांगलीच दमछाक केली होती.
-पृथ्वीराज चव्हाणांना त्यावेळी 76 हजार 831 मतं मिळाली होती, तर विलासकाकांना 60 हजार 413 मतं आणि अतुल भोसले यांनी तब्बल 58 हजार 621 मतं मिळवली होती.
विलासरावांचे जावई
डॉ. अतुल भोसले हे कराडचे युवा नेते म्हणून ओळखले जातात. अतुल भोसले हे सध्या भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत. त्यांचे आजोबा जयवंतराव भोसले हे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक होते. अतुल यांचे वडील डॉ. सुरेश भोसले हे कृष्णा कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष तर स्वत: अतुल भोसले हे कऱ्हाडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजचे संचालक आहेत. तसेच भोसले हे राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे जावई आहेत, विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांची कन्या अतुल भोसले यांची पत्नी आहेत.