पोलिसांवर हात उचलणाऱ्यांचे हातच तोडा, अंबादास दानवे आक्रमक, संध्याकाळपर्यंत कारवाई करा, चंद्रकांत खैरेही भडकले
संभाजीनगरात रात्रभर घडलेल्या तणावानंतर आता यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. शहरातील अशांतेसाठी भाजप आणि एमआयएमला जबाबदार धरण्यात आलंय.
दत्ता कनवटे, छत्रपती संभाजीनगर : रामनवमीच्या (Ramnavami) आदल्या दिवशी संभाजीनगर (Sambhajinagar) शहरातील किराडपुरा भागात (Kiradpura) उसळलेल्या दंगलसदृश्य स्थितीसाठी भाजप आणि एमआयएम जबाबदार आहे, असा थेट आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला आहे. या घटनेदरम्यान दोन गटात प्रचंड वाद, हाणामारी, दगडफेक झाली. या वादावर नियंत्रण मिळवण्यासाठी आलेल्या पोलिस आधिकाऱ्यांवरही हल्ला झाला. पोलिसांची १० ते १२ वाहन जाळण्यात आली. पोलिस अधिकाऱ्यावर हात उचलण्याची यांची हिंमतच कशी होते, या लोकांचे हातच तोडून टाका, असा आक्रमक पवित्रा विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी घेतलाय. तर भाजप आणि एमआएयएमची ही मिलिभगत असल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केलाय.
त्यांचे हातच तोडून टाका- दानवे
संभाजीनगरात काल रात्री किराडपुऱ्यात झालेल्या राड्यानंतर आज सकाळपासून राजकीय नेत्यांनी पाहणी दौरे केले. शिवसेना नेते अंबादास दानवे यांनीही सकाळीच या ठिकाणाला भेट दिली. यावेळी प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे म्ङणाले, ‘ मागील महिनाभरापासून आम्ही आवाहन करत आहोत. शहराचं वातावरण अशांत करून जनतेच्या मनात विष पेरण्याचा प्रयत्न चालू आहे.
याला जबाबदार कोण आहे… मुस्लिमांच्या बाजूने एमआयएमसारखी संघटना १०-१० दिवस आंदोलन करते. पोलिस अधिकाऱ्यांवर हात उचलण्याची हिंमत होते, हे हात तोडले पाहिजेत. जे संरक्षण करतात, ते हात तोडलेच पाहिजेत.या घटनेमागे एमआयएम आणि भाजप आहे. या लोकांना शहरात दंगल पाहिजे. त्यांचा जनाधार कमी होतोय. म्हणून मुस्लिम समाजाला उचकवणं, सुजाण जनता निमूटपणे बघतेय. मात्र या लोकांवर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली.
चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
शहरातील वातावरण बिघडवणाऱ्यांवर आज संध्याकाळपर्यंत कठोर कारवाई झाली पाहिजे. ज्यांनी तोडफोड केली आहे, त्यांना उचलून आतमध्ये फेकून दिलं पाहिजे. हे बाहेर आले नाही पाहिजेत. एखाद्या पोलिसाला कुणी दम मारला तर त्यावर ३५३ दाखल करता, इथे पोलिसांच्या गाड्या जाळल्या तरी काहीच कारवाई नाही. हे सगळं भाजप-एमआयएम आणि मिंधे गटाच्या मिलिभगतचं काम आहे, असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलंय.
‘आधी उचकवायचं, मग शांती रखो…’
जलील इथे निवडून आल्यापासून हा गोंधळ सुरु झाला आहे. त्याला फडणवीस आणि मिंधे गट मदत करता. एवढे दिवस तिथे उपोषण केलं. रात्रभर गोंधळ घालू लागले. बिर्याणी खाऊ लागले, हे पोलिसांना कळलं नाही का, तत्काळ त्यांना उचलून फेकून द्यायला पाहिजे होतं… याआधीही जलील यांनी असं नाटक केलं होतं. त्याच्याच मोबाइलने फोन केला, १० हजार लोक गोळा केले, परत म्हणतो शांती रखो… आधी उचकवायचं आणि शांती रखो म्हणतात, असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केलाय.