Aurangabad corona Update : घाटी रुग्णालयात कोरोना रुग्णांचे प्रचंड हाल, एका बेडवर 3 रुग्ण!
रुग्णसंख्या वाढत असल्याने आता रुग्णालयांची व्यवस्थाही कोलमडून पडत आहे. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोना रुग्णांचे मोठे हाल सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे
औरंगाबाद : राज्यातील कोरोनाची स्थिती विदारक बनत चालली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद अशा शहरांमधील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून काही निर्बंध घालण्यात आले आहेत. पण अशा परिस्थितीतही कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्याने आता रुग्णालयांची व्यवस्थाही कोलमडून पडत आहे. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोना रुग्णांचे मोठे हाल सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.(Shweta Mahale criticizes state government over corona patients’ condition at Ghati Hospital)
भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील विदारक चित्र मांडणारे काही फोटो ट्वीट केलेत. या फोटोमध्ये एकाच बेडवर तीन रुग्ण, बेड अभावी रुग्णांवर फरशीवर झोपावं लागत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत ऑक्सिजनची नळी नाकाला लावून हे रुग्ण उपचार घेत असल्याचं टा फोटोंमधून पाहायला मिळत आहे.
आमदार श्वेता महालेंची राज्य सरकारवर टीका
“सरकार वाचवण्यासाठी जेवढी धडपड महाआघाडी करत आहे. तेवढीच धडपड सर्वसामान्य जनतेच्या जीव वाचविण्यासाठी केली तर जनतेचे अमूल्य जीव वाचतील. तसेच कोरानाच्या संकटामधून महाराष्ट्र लवकर मुक्त होईल.औरंगाबाद घाटी येथील ही आहे भयावह परिस्थीती”, असं ट्वीट करत श्वेता महाले यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केलीय.
सरकार वाचवण्यासाठी जेवढी धडपड महाआघाडी करत आहे तेवढीच धडपड सर्वसामान्य जनतेच्या जीव वाचविण्यासाठी केली तर जनतेचे अमूल्य जीव वाचतील तसेच कोरानाच्या संकटा मधून महाराष्ट्र लवकर मुक्त होईल.औरंगाबाद घाटी येथील ही आहे भयावह परिस्थीती….@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @rajeshtope11 pic.twitter.com/QKRVXEuK33
— MLA Shweta Mahale Patil (@MLAShwetaMahale) March 24, 2021
औरंगाबादेतील कोरोना स्थिती –
औरंगाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात 552 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर औरंगाबाद महापालिका क्षेत्रात 899 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर महापालिका आणि जिल्ह्यात मिळून 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. औरंगाबाद महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यातील कोरोनाची आकडेवारी पाहिली तर आतापर्यंत 73 हजार 750 जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर आतापर्यंत 1 हजार 325 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
बुधवारी 2021 मधील सर्वाधिक रुग्णसंख्या
राज्यात आज 2021 मधील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. आज दिवसभरात 31 हजार 855 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात 15 हजार 98 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दिवसभरात 95 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. राज्यात सध्या 2 लाख 47 हजार 299 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील आतापर्यंतचा कोरोना रुग्णांचा आकडा 25 लाख 64 हजार 881वर जाऊन पोहोचला आहे. त्यातील 22 लाख 62 हजार 593 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 53 हजार 684 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.
राज्यात आज 31,855 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 15098 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2262593 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 247299 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.21% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 24, 2021
संबंधित बातम्या :
Shweta Mahale criticizes state government over corona patients’ condition at Ghati Hospital