अब्दुल सत्तार यांचा काँग्रेसला मोठा झटका, औरंगाबाद जिल्हा बँकेच्या अध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश!
औरंगाबाद जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नितीन पाटील यांनी आज हाती शिवबंधन बांधलं.
औरंगाबाद : शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसला अजून एक झटका दिलाय. औरंगाबाद जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नितीन पाटील यांनी आज हाती शिवबंधन बांधलं. नितीन पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी अब्दुल सत्तार प्रयत्नशील होते. आज अखेर नितीन पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. (Aurangabad District Bank Chairman Nitin Patil joins Shiv Sena)
गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेली जिल्हा बँक आता शिवसेनेच्या ताब्यात आली आहे. जिल्ह्यातील एक मोठी सहकारी संस्था ताब्यात आल्यामुळे शिवसेनेचं बळ अधिक वाढलं आहे. आता जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन पाटील यांना शिवसेनेत प्रवेश देत सत्तार यांनी राज्यातील महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेला मोठा झटका दिलाय.
जिल्हा बँक निवडणुकीत हरिभाऊ बागडेंचा पराभव!
जिल्हा बँक निवडणुकीचा धक्कादायक निकाल समोर आला होता. माजी विधानसभा अध्यक्ष आणि बँकेचे संचालक असलेले हरिभाऊ बागडे यांना पराभवाचा धक्का बसला. या निवडणुकीत अनेक अनपेक्षित निकाल पाहायला मिळाले. जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील मोठं नाव असलेल्या बागडेंचा पराभव हा जिल्ह्याच्या राजकारणाचं बदललेलं वार असल्याचं तेव्हा बोललं गेलं.
जिल्हा बँक निवडणुकीत बागडे यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला होता. मात्र स्वत: बागडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. अपक्ष उमेदवार अभिषेक जैस्वाल यांनी बागडे यांचा पराभव केला. बागडे यांना एकूण 123 मतं मिळाली, तर जैस्वाल यांना 147 मतं पडली. त्यामुळे जैस्वाल यांनी 24 मतांनी बागडे यांचा पराभव केला. बिगर शेती संस्थेच्या विभागातून बागडे यांचा पराभव झाला
मतदान केंद्राबाहेर राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचा पारा चढला!
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी 21 मार्च रोजी मतदान पार पडलं. त्यावेळी मतदान केंद्राबाहेर एक पोलीस कर्मचारी आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. पोलीस कर्मचाऱ्याने अब्दुल सत्तार यांना बाजूला थांबायला सांगितलं. त्यावरुन सत्तार यांनी मतदान केंद्राबाहेर चांगलाच गोंधळ घातल्याचं सांगितलं जात आहे. क्रांती चौकातील मतदान केंद्रावर तब्बल अर्धा तास हा गोंधळ सुरु होता. तर विरोधी पॅनलच्या लोकांकडून पैसे घेतल्याचा आरोप राज्यमंत्र्यांनी केला. त्यावर संतापलेल्या पोलिसांनी सत्तार यांना उत्तर दिलं. त्यानंतर बराच वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
संबंधित बातम्या :
औरंगाबाद जिल्हा बँक निवडणुकीत हरिभाऊ बागडेंचा पराभव!, ‘गड आला पण सिंह गेला’ – अब्दुल सत्तार
Video : मतदान केंद्राबाहेर राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचा पारा चढला, नेमकं कारण काय?
Aurangabad District Bank Chairman Nitin Patil joins Shiv Sena