Raj Thackeray : राज ठाकरेंवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता, तीन प्रमुख अटींचं उल्लंघन झाल्याचा ठपका, भाषणाचं पोस्टमार्टम
राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी घालण्यात आलेल्या अटींचं तंतोतंत पालन करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्ही पंधरा हजारांनाच बोलावलं होतं, पण राज ठाकरेंच्या सभेला लोकांनी स्वतःहून गर्दी केली, यात आमची चुकी नाही. मुळात राज ठाकरेंच्या सभेला लोकांच्या संख्येची अट घालणंच चुकीचं आहे, असं मनसे नेते अविनाश जाधव यांनी म्हटलं.
औरंगाबादः मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर कारवाई करण्याची तयारी औरंगाबाद पोलिसांनी सुरु केल्याची माहिती हाती आली आहे. राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देण्यापूर्वी पोलिसांनी काही अटी आणि शर्थी मनसेसमोर ठेवल्या होत्या. त्या अटींचं पालन करू, असं आश्वासनही मनसे नेत्यांनी दिलं होतं. मात्र राज ठाकरे यांच्या सभेत तीन प्रमुख अटींचं उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानुसार, या भाषणाचं पोस्टमॉर्टेम पोलिसांकडून (Aurangabad Police) केलं जात आहे. राज ठाकरे यांच्या सभेला फक्त 15 हजार लोक आले पाहिजेत, अशी प्रमुख अट पोलिसांकडून घालण्यात आली होती. मात्र या अटीचं उल्लंघन झालं आहे.तसेच इतरही काही अटी सभेत मोडण्यात आल्या असून याविरोधात पोलीसांकडून गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोणत्या तीन अटींचं उल्लंघन?
1. 15 हजाराची अट असताना जास्त गर्दी जमवली 2. प्रक्षोभक भाषण करणे 3. वैयक्तिक टीका टिप्पणी करणे
आयोजकांवरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता
औरंगाबाद येथील राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी पोलिसांनी 16 अटी घातल्या होत्या. त्यात वैयक्तिक टीका टिप्पणी करणे, गर्दी जमवणे, प्रक्षोभक भाषण करणे या तीन अटींचं उल्लंघन झाल्याचं बोललं जात आहे. पोलीसांकडून राज ठाकरे यांच्या भाषणाचा कसून अभ्यास केला जात आहे. सभेचा सगळा डेटा तपासून पोलिसांनी एक अहवाल तयार केला आहे. तो तपासल्यानंतर गृहमंत्रालयाकडे सादर केला जाईल. गृहमंत्रालयाकडून आदेश आल्यानंतर औरंगाबाद पोलीस आयोजकांवर गर्दी जमवल्याबद्दल तसेच राज ठाकरे यांच्याविरोधात प्रक्षोभक भाषण केल्यावरून गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे.
‘आम्ही तर 15 हजारांनाच बोलावलं’
दरम्यान, मनसे नेते अविनाश जाधव यांनी यावर प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी घालण्यात आलेल्या अटींचं तंतोतंत पालन करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्ही पंधरा हजारांनाच बोलावलं होतं, पण राज ठाकरेंच्या सभेला लोकांनी स्वतःहून गर्दी केली, यात आमची चुकी नाही. मुळात राज ठाकरेंच्या सभेला लोकांच्या संख्येची अट घालणंच चुकीचं आहे, असं अविनाश जाधव यांनी म्हटलं. तसंच सभेनंतर आमच्यावर खोटे गुन्हे दाखल होणार, याची कल्पना आम्हालाही होती, असं वक्तव्य त्यांनी केलं.