Aurangabad | मुजोर रिक्षाचालकांनी औरंगाबादेत गुंडगिरी, प्रवाशाला बेदम मारहाण, भररस्त्यात राडा!
आधी महागाईनं सर्वसामान्य माणूस बेजार झाला आहे. त्यात रिक्षा प्रवास परवडत नसतानाही पर्याय नसल्यानं आता लोकांना अधिकची रक्कम मोजावी लागते आहे. दरम्यान, एका प्रवाशानं वाढीव प्रवासी शुल्कावरुन आवाज उठवल्यानं इतर रिक्षा चालकांनी त्यांच्यासोबत आधी वाद घातला.
औरंगाबाद : औरंगाबादेत (Aurangabad) रिक्षा चालकांनी मिळून एका प्रवासाला मारहाण केली आहे. प्रवाशी शुल्कावरुन वाद होऊन अखेर काही रिक्षाचालकांनी एकत्र एका प्रवाशाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात एसटीचा संप सुरुर आहे. अशातच एसटी बसची (ST Bus) संख्या कमी असल्यानं अनेकदा प्रवाशांना रिक्षा शिवाय दुसरा पर्याय उरत नाहीये. याच गैरसोयीचा फायदा उचलत काही रिक्षा चालकांनी आपली मुजोरी सुरु केली आहे. वाढीव प्रवास शुल्कावरुन असाच एक वाद औरंगाबादेत झाल्याच उघडकीस आलं आहे.
आधी महागाईत त्यात दुष्काळात तेरावा
आधी महागाईनं सर्वसामान्य माणूस बेजार झाला आहे. त्यात रिक्षा प्रवास परवडत नसतानाही पर्याय नसल्यानं आता लोकांना अधिकची रक्कम मोजावी लागते आहे. दरम्यान, एका प्रवाशानं वाढीव प्रवासी शुल्कावरुन आवाज उठवल्यानं इतर रिक्षा चालकांनी त्यांच्यासोबत आधी वाद घातला. त्यानंतर ही बाचाबाची इतकी वाढली की रिक्षाचालकांनी अखेर गुंडगिरी करत प्रवाशालाच मारहाण केली.
आधी बाचाबाची आणि मग लाथा-बुक्के
औरंगाबादच्या मध्यवर्ती बस स्थानक परिसरात हा धक्कादायक प्रकार घडल्याचं उघडकीस आलं आहे. जवळपास चार ते पाच रिक्षा चालकांनी एकत्र येत प्रवाशाला बेदम मारहाण केली आहे. लाथा बुक्क्यांनी प्रवाशाला मारहाण केल्यानं यात एक प्रवासी जखमी झाला आहे. दरम्यान, बाचाबाची आणि वाद यामुळे मध्यवर्ती बस स्थानक परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
मुजोरीला आवरा!
आधीच एसटी सेवा पूर्ववत झालेली नाही. त्यात रिक्षावाल्यांचा मनमानी कारभार सुरु असल्यानं सर्वसामान्यांचं बजेट पुरतं कोलमडलं आहे. फक्त औरंगाबादेतच नव्हे तर राज्यातील वेगवेगळ्या ग्रामीण भागात लोकांची रिक्षाचालक आणि खासगी वाहन चालकांकडून लूट असल्याचे प्रकार घडत असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, आता या मुजोरीला रोखायचं तरी कसं, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलंय.