Aurangabad crime: पेट्रोल पंपावरून पावणेचार लाख रुपयांची बॅग पळवली, व्यापाऱ्याची पोलिसात धाव
ही घटना घडल्यानंतर गायकवाड व मुजीब यांनी घटनेची माहिती दोन तासानंतर मालक नाडार यांना कळवली. नाडार यांच्यासह गायकवाड व मुजीब यांनी जिन्सी पोलीस ठाण्यात धाव घेतली. जिन्सी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबादः शहरातील जैन पेट्रोल पंपावर धाडसी चोरी (Aurangabad theft) झाल्याचे उघड झाले असून या चोरीत व्यापाऱ्याकडून तब्बल पावणेचार लाख रुपयांची बॅग चोरट्यांनी लांबवली. ही घटना गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. शहरातील जुना मोंढा नाका ते जाफर गेट रस्त्यावरील जैन पेट्रोल (Jain Petrol Pump) पंपावर ही घटना घडली. दुचाकीवर आलेले चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
टेम्पोतून निघाले होते बँकेच्या दिशेने
जिन्स ज्ञानराज नाडार यांचा पडेगाव येथे गोळ्या-बिस्किटांचा कारखाना आहे. त्यांच्याकडे सलोमन सॅमसन गायकवाड आणि मुजीब जुल्फेकार सय्यद हे दोघे कामाला आहेत. गुरुवारी संध्याकाळी दोघेही टेम्पोतून तीन लाख 63 हजारांची रोकड घेऊन बँकेत जात होते. दरम्यान, रात्री आठच्या सुमारास जाफर गेट रस्त्यावरील जैन पेट्रोल पंपावर टेम्पोत डिझेल भरण्यासाठी ते थांबले. त्यावेळी बॅग सीटवर ठेवून ते खाली उतरले. ही संधी साधून अॅक्टीव्हावरून आलेले दोन टचोरटे बॅग घेऊन पसार झाले. या दुचाकीला नंबरही नव्हता.
बॅग नेल्याने कळताच दोघांनी आरडाओरड केली
दरम्यान आपल्या टेम्पोतील बॅग चोरीला गेल्याचे कळताच या दोघांनी आरडाओरड केली. तोपर्यंत चोरटे पसार झाले. ही घटना घडल्यानंतर गायकवाड व मुजीब यांनी घटनेची माहिती दोन तासानंतर मालक नाडार यांना कळवली. नाडार यांच्यासह गायकवाड व मुजीब यांनी जिन्सी पोलीस ठाण्यात धाव घेतली. जिन्सी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीसीटीव्हीत चोर कैद
दरम्यान पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरीची ही घटना कैद झाली आहे. जिन्सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, उपनिरीक्षक गोकुळ ठाकूर, अनंत तांगडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. परिसरातील इतर ठिकाणचेही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी हस्तगत केले आहे. लवकरच या चोरीच्या मुळापर्यंत पोलीस पोहोचतील.
इतर बातम्या-
तिरुपतीचे बनावट पास देणाऱ्या भामट्याला बेड्या, 61भाविक दर्शनाविनाच परतले होते औरंगाबादेत