मोठी बातमी ! नाराजीच्या चर्चा… पंकजा मुंडे आणि अमित शाह आज एकाच मंचावर; नांदेडमधील सभेत पंकजा काय बोलणार?
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नांदेड दौऱ्यावर आहेत. नांदेड येथील सभेला ते संबोधित करणार आहेत. यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडेही उपस्थित राहणार आहेत.
नांदेड : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. महाराष्ट्रातही 30 जूनपर्यंत भाजपने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज भाजपची नांदेडमध्ये सभा होत आहे. या सभेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. तसेच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेही या सभेला संबोधित करणार आहेत. पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा होती. त्यांनी काही धक्कादायक विधानंही केली होती. त्यामुळे या नाराजीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे आणि अमित शाह पहिल्यांदाच एका मंचावर येत असल्याने आजच्या नांदेडमधील सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आज संध्याकाळी 6 वाजता नांदेडच्या तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहेब येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेला भाजपचे नेते अमित शाह संबोधित करणार आहेत. पंकजा मुंडेही या सभेला येणार आहे. या सभेला 40 हजार लोक उपस्थित राहतील, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पंकजा यांचं ते विधान
दोन आठवड्यापूर्वी पंकजा मुंडे या राष्ट्रीय समाज पक्षाच्या मेळाव्याला गेल्या होत्या. या मेळाव्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. यावेळी मी भाजपची आहे. भाजप माझा पक्ष थोडीच आहे, असं विधान केलं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. राजकीय चर्चांना उधाण आल्यानंतर पंकजा मुंडे यांनी घुमजावही केलं होतं. मी तसं म्हणालेच नाही, माझ्या म्हणण्याचा विपर्यास केल्याचा दावा त्यांनी केला होता.
जाहीर सभेतून बोलणार?
या चर्चा थांबत नाही तोच पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची भेट घेतल्याने पुन्हा राजकीय वर्तुळात तर्कवितर्क वर्तवले गेले. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमात अमित शाह माझे नेते आहेत. मी लवकरच त्यांना भेटून माझं म्हणणं मांडणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, योगायोगाने आजच पंकजा मुंडे आणि अमित शाह हे एकाच मंचावर येणार आहेत. नांदेडच्या सभेच्या निमित्ताने या भेटीचा योग आला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे अमित शाह यांची भेट घेऊन म्हणणं मांडणार की शाह यांच्या समोरच जाहीरसभेतून काही भाष्य करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
लोकसभेच्या प्रचाराला आजपासून सुरुवात
दरम्यान, लोकसभा निवडणुकीला आता अवघे काही महिने बाकी आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. नांदेडमधील अमित शाह यांच्या सभेच्या माध्यमातून आजपासून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात येत असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. राज्यातील 48 मतदारसंघात 48 सभा होणार आहे. नांदेडपासून त्याची सुरुवात करत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.