औरंगाबादः साताऱ्यातील हेमाडपंथी खंडोबा मंदिराचे सर्वेक्षण, जीर्णोद्धाराचा डीपीआर लवकरच देणार
मंदिराची ही वास्तु पुरातत्त्व विभागाने ऐतिहासिक वारसा स्थळ म्हणून संरक्षित केली आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात यावा, अशी या भागातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.
औरंगाबादः शहराच्या सातारा भागात असलेल्या ऐतिहासिक खंडोबा मंदिराचे (Khandoba temple) सर्वेक्षण पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सुरु केले. पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी पुरातत्त्व विभागाला मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा अर्थात डीपीआर (DPR) सादर करण्याच्या सूचनाही विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार नाशिकच्या पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सर्वेक्षणाचे काम सुरु केले आहे.
जीर्णोद्धाराच्या कामाला वेग
पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सातारा येथील खंडोबा मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्र्यांनी तातडीने पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याशी चर्चा करून जिल्हा प्रशासनाकडून प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली. त्यानुसार9 सप्टेंबर रोजी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी खंडोबाचे दर्शन घेऊन पाहणी केली. आमदार शिरसाट यांनी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यानुसार या कामाला आता वेग आला आहे.
नाशिक येथील पथक सर्वेक्षणासाठी दाखल
नाशिक येथील राज्य पुरातत्त्व विभागाचे अधिकारी कासार पाटील यांच्या नेतृत्वाखाली सात अधिकाऱ्यांचे पथक मंगळवारी खंडोबा मंदिरात दाखल झाले. अधिकाऱ्यांनी गाभाऱ्यातील दगडी रेखीव कामाचे निरीक्षण करून दगडाची लांबी, रुंदीचे मोजमाप केले. तसेच खांबावरील नक्षीकाम, दगडाचा प्रकार, बांधकामासाठी वापरण्यात आलेले साहित्य, दीपमाळ, विटा व चुना याची अत्यंत बारकाईने पाहणी करून सर्वेक्षण केले. बुधवारी पुन्हा पथक सर्वेक्षण करणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर डीपीआर करून जिल्हा प्रशासनाला सादर केला जाणार आहे. यावेळी खंडोबा मंदिर संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष साहेबराव पळसकर, सचिव गंगाधर पारखे, विश्वस्त मोहन काळे, दिलीप दांडेकर, विठ्ठल देवकर, शिवसेनेचे उपशहरप्रमुख रमेश बहुले आदींची उपस्थिती होती.
पुण्यश्लोक अहिल्याबाईंची निर्मिती
औरंगाबादच्या सातारा गावात डोंगर पायथ्याशी असलेले खंडोबाचे हेमाडपंथी मंदिर हे एकाच दगडात निर्माण केलेले मंदिर आहे. अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून 1766 मध्ये त्याचा जीर्णोद्धार केला. मंदिराचा गाभाऱ्यापर्यंतचा भाग दगडी व त्यावरील कळसापर्यंतचा भाग वीटांनी बांधला. मंदिराची ही वास्तु पुरातत्त्व विभागाने ऐतिहासिक वारसा स्थळ म्हणून संरक्षित केली आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात यावा, अशी या भागातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.
इतर बातम्या-