साहित्यिकांना वेध 41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे, अशोक चव्हाणांच्या हस्ते उद्घाटन, कोरोनामुळे ग्रंथदिंडी रद्द
शहरातील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे 25 आणि 26 सप्टेंबर रोजी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. कोरोना पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून संमेलनाचे मुख्य आकर्षण असलेली ग्रंथदिंडीही रद्द करण्यात आली आहे.

औरंगाबाद: 41 वे मराठवाडा साहित्य संमेलन (41th Marathwada Sahitya Sammelan ) येत्या 25 आणि 26 सप्टेंबर रोजी औरंगाबाद शहरात आयोजित करण्यात आले आहे. मागील दोन वर्षी कोरोनामुळे मराठवाडा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले नव्हते. गेल्या वर्षीदेखील देगलूर येथील संमेलन कोरोना प्रादुर्भावामुळे रद्द झाले होते. यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे अगदी साधेपणाने का होईना, संमेलन आयोजित करण्याचा निर्णय मराठवाडा साहित्य परिषदेने घेतला आहे. औरंगाबादच्या लोकसंवाद फाउंडेशनने (Loksanvad Foundation) संमोलनाचे आयोजकत्व स्वीकारले असून ही संस्था आणि मराठवाडा साहित्य परिषदे (Marathwada Sahitya Parishad)च्या माध्यमातून संमेलनाची तयारी सुरु आहे.
उद्घाटनाला अशोक चव्हाण येणार
41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन 25 सप्टेंबर रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते होईल. तर संमेलनाचा समारोप26 सप्टेंबर रोजी सायंकाळी होईल. या सोहळ्यास गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित राहतील. संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. राजेश कपडे यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकारपरिषदेत यासंबंधीची माहिती दिली. शहरातील यशवंतराव चव्हाण सभागृहात संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोनामुळे ग्रंथदिंडी रद्द
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी जमणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांवर सध्या बंदी आहे. त्यामुळे एरवी संमेलनाचे मुख्य आकर्षण असलेली ग्रंथदिंडीही रद्द करण्यात आली आहे. औरंगाबादेत 2001 मध्ये मराठवाडा साहित्य संमेलन झाले होते. त्यानंतर तब्बल 20 वर्षांनी हे संमेलन होत आहे. मागील वर्षी देगलुर येथील आयोजित संमेलन रद्द झाल्यानंतर औरंगाबादच्या युवा प्राध्यापकांच्या लोकसंवाद फाउंडेशनने संमेलनासाठी यंदाच्या वर्षी पुढाकार घेतला आहे. लोकसंवाद फाउंडेशनच्या वतीने आगामी मराठवाडा साहित्य संमेलनासाठीच्या बोधचिन्हाचे अनावरण नुकतेच करण्यात आले. संमेलनाच्या बोधचिन्हाच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसा जोपासण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
ग्रंथ प्रदर्शनासाठीची नोंदणी सुरु
कोरोनाचा प्रसार आणि महाराष्ट्र शासन तसेच स्थानिक प्रशासनाचे नियम पाळूनच हे संमेलन घेण्यात येईल, अशी ग्वाही लोकसंवाद फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आली. तसेच संमेलनाच्या अध्यक्षस्थानी देगलूरचे ज्येष्ठ कादंबरीकार बाबू बिरादार हे असतील. संमेलनाकरिता ग्रंथ प्रदर्शनासाठीच्या स्टॉलचा दर 2000 रुपये एवढा ठेवण्यात आला आहे. स्टॉलची साइज 8 बाय 10 फूट असून स्टॉलमधील एका कर्मचाऱ्याला दोन दिवस नाश्ता, भोजन व निवासाची व्यवस्था केली जाईल. एका संस्थेसाठी एकच स्टॉल दिला जाईल. प्रथम नोंदणी करणाऱ्याला प्राधान्य दिले जाईल, अशी सूचना आयोजकांनी केली आहे. तसेच संमेलनात स्टॉल नोंदणीसाठी – 9175274500 किंवा 8888377499 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इतर बातम्या-
Aurangabad Gold: सोन्याचे भाव शंभर रुपयांनी वाढले, जाणून घ्या औरंगाबादेतल्या सराफा मार्केटमधील दर