Aurangabad: वकिलाची जात पाहून रो हाऊस नाकारले, औरंगाबादेत अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!
जातीमुळे अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा आरोप करत औरंगाबादमधील वकिलाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी सहा जणांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबादः नवे घर बुक करण्यासाठी गेलेल्या एका वकिलाच्या कुटुंबाला बांधकाम साइटवरील कर्मचाऱ्याने आधी जात विचारली. अनुसूचित जात कळाल्यानंतर घर दाखवण्यासाठी टाळाटाळ केल्याचा आरोप एका वकिलांनी केला आहे. आमच्या जातीमुळे अशा प्रकारे अपमानास्पद वागणूक दिली गेल्याचा आरोप सदर वकिलांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी चिकलठाणा पोलीस स्टेशनमध्ये याविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर बांधकाम साइटवरील कर्मचाऱ्यांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय घडला नेमका प्रकार?
या प्रकरणी अॅड. महेंद्र गंडले यांनी तक्रार दाखल केली आहे. महेंद्र यांनी टीव्ही9च्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की, ते 7 जानेवारी रोजी पत्नी, मुलांसह भाईश्री गुपची भूमी विश्वबन येथील रो हाऊसची साइट बघण्यासाठी गेले. येथील रो हाऊस आवडल्यानंतर त्यांनी साइटवरील कर्मचाऱ्यांना त्याबद्दल चौकशी केली. तेव्हा कर्मचाऱ्यांनी गंडले यांना जात विचारली. अॅड. गंडले यांनी अनुसूचित जातीचे असल्याचे सांगितले. त्यानंतर तुमच्या जातीच्या लोकांना घर देता येणार नाही, असे त्याने सांगितले. तसेच त्यानंतर त्यांनी बिल्डरचे कार्यलय गाठून घराची चौकशी केली, तिथेही मला जात विचारून घर नाकारण्यात आल्याचे अॅड. गंडले यांनी सांगितले.
जातीवरून घर नाकारल्याचा आरोप!
या सगळ्या प्रकाराविरोधात अॅड. गंडले यांनी चिकलठाणा पोलीस स्टेशनमध्ये अॅट्रॉसिटीची तक्रार दिली. त्यावरून भाईश्री ग्रुपचे मकरंद देशपांडे, सोमाणी, जैन, बांधकाम साइटवरील कर्मचारी योगेश निमगुडे, सागर गायकवाड व इतरांविरुद्ध चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर बातम्या-