Aurangabad | विमानतळ परिसरात ड्रोनला मनाई, नियमभंग केल्यास ड्रोनवर गोळ्या झाडण्याचे आदेश!
2021 मध्ये केंद्र शासनाने केलेल्या ड्रोन विषयक नियमावलीनुसार ही कारवाई केली आहे. या आदेशानुसार केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल ड्रोनला शूट करू शकतो.
औरंगाबादः शहरातील विमानतळाच्या (Airport) तीन किलोमीटर परिसरात आकाशात ड्रोन (Drone) उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षेच्या (Security) कारणास्तव हा नियम करण्यात आला आहे. विमानतळ प्रतिबंधित क्षेत्रात ड्रोन उडताना दिसल्यास प्रथम त्याला ड्रोन खाली उतरवण्याचा इशारा द्यावा. त्यानंतर ड्रोनने आदेश न पाळल्यास त्याच्यावर गोळ्या झाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विमानतळ प्रतिबंधित श्रेत्राच्या तीन किलोमीटर क्षेत्रात विना परवानगी ड्रोन उडवल्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा स्पष्ट आदेशही देण्यात आला आहे. त्यामुळे चित्रीकरणासाठी विमानतळ परिसरात ड्रोन उडवणाऱ्या नागरिकांनी अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय
विमानतळ प्रतिबंधित क्षेत्रात विना परवानगी ड्रोन उडवल्याने मागील तीन वर्षात दोन जणांवर विमानतळ प्राधिकरणाने कारवाई केली. 2021 मध्ये केंद्र शासनाने केलेल्या ड्रोन विषयक नियमावलीनुसार ही कारवाई केली आहे. या आदेशानुसार केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल ड्रोनला शूट करू शकतो. यासोबतच संबंधितांना जेलची हवादेखील खाण्याची वेळ येऊ शकते. विमानतळ सुरक्षितता तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ड्रोन बंदी घालण्यात आली आहे. ड्रोन उडवायचे असल्यास विमानतळ प्रशासनाची परवानगी घेणे गरजेचे आहे. जून 2021 मध्ये जम्मू येथील विमानतळावर स्फोटके असलेले दोन ड्रोन आढळले होती. या पार्श्वभूमीवर ही नियमावली केली आहे. ड्रोन किंवा रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या विमानांच्या सहाय्याने शहरावर दहशतवादी हल्ला होऊ शकतो. यासाठी केंद्र शासनाने या संदर्भातील नियम कडक केले आहेत.
नियम मोडणाऱ्यांवर कारवाई झालीच
कोविडपूर्व काळात विमानतळाच्या 3 किमी क्षेत्रात ड्रोन उडवण्याची परवानगी एका संस्थेने मागितली होती. मात्र परवानगीची मुदत संपल्यावरही ड्रोन उडवल्याने त्यांना कारवाईला सामोरे जावे लागले होते. विमानतळाशेजारी असलेल्या मंगल कार्यालयात आयोजित लग्नसमारंभात विना परवाना ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यात येत होते. हे दोन्ही प्रकार सीआयएसएफ जवानाच्या निदर्शनास येताच कारवाई करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.